सातारा : शिवसागर जलाशयातून बोटीतून मतपेट्यांची वाहतूक

Last Updated: Oct 20 2019 8:13PM
Responsive image

Responsive image

बामणोली : प्रतिनिधी

सातारा लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या दि.२१ रोजी मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम मतदान केंद्रांवर मतपेट्या आणि कर्मचारी यांना पाठविण्यासाठी बोटीचा वापर केला आहे. 

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील सोळा गांवात मतपेट्या आणि कर्मचारी यांना पाठविण्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला आहे. तेथील डोंगर मुऱ्यावरील अतिशय दुर्गम भागात चकदेव, पर्वत येथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणुन, महाबळेश्वर मार्गे तापोळा येथुन बार्ज बोटीतून (तराफा) मतपेट्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गाडया पलीकडे पाठवल्या आहेत. यानंतर येथून पुढे दरे  तर्फ तांब मार्गे कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांमध्ये पेट्यांची वाहतूक करण्यात आली. 

तसेच जावली तालुक्यातील अतिदुर्गम रवंदी, खिरखंडी, कारगांव या तीन केंद्रावर सातारा मार्गे बामणोली या येथील मतपेट्या व कर्मचारी यांना घेऊन तीन बोटी मार्गस्थ झाल्या. प्रत्येक केंद्रावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत एक पोलिस कर्मचारी देखील देण्यात आले आहेत. कांदाटी खोऱ्यात दरे तर्फ तांब गावाच्या पुढे रस्ता कच्चा असल्याने तिथून पुढे जाणाऱ्या वाहनांना सततच्या पावसामुळे चिखलातून जाताना मोठी कसरत करावी लागते. तर पावसाने रिपरिप चालूच ठेवल्याने मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.