Sat, Jul 20, 2019 15:24होमपेज › Satara › महामार्गावर वाहतुकीची ऐशी की तैशी 

महामार्गावर वाहतुकीची ऐशी की तैशी 

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 10:22PM

बुकमार्क करा

उंब्रज : सुरेश सूर्यवंशी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चालकांचा बेफिकीरपणा, प्रवाशांचा निष्काळजीपणा व वाहतुकीच्या नियमांचे होणारे उल्‍लंघन यामुळे उंब्रज ता.कराड येथे महामार्गावरील थांबा म्हणजे अपघात क्षेत्र झाले आहे. 

महामार्गावर वाहतुकीची ऐशी की तैशी झाली असून याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. महामार्गाचे चौपदरीकरण साकार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण बर्‍याच अंशी कमी झाले असले तरी चौपदरीकरणांतर्गत रस्ते विकास महामंडळाकडून राहिलेल्या चुकांचा त्रास (उड्डाण पूलाऐवजी भराव पूल झाल्याने) आजही प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे वहानाची वेग मर्यादा वाढण्याबरोबरच या वेगमर्यादेवर वाहन चालकाचे नियंत्रण नसल्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात सत्र सुरूच आहे.  

चौपदरीकरणाच्या कामात एसटी महामंडळाचा तोटा मोठ्या प्रमाणात झाला असून, याचा नाहक त्रास प्रवासी व नागरिक यांना झाला आहे, होत आहे आणि यापुढेही होणार अशीच काहीशी परिस्थिती आहे. बसस्थानकात लांब पल्याच्या एसटी येत नसल्यामुळे प्रवाशांना बसस्थानक ते महामार्ग असे वरखाली करावे लागते. तर पुणे, मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना महामार्गाचाच आधार घ्यावा लागत आहे. कारण येथील सर्व्हिस रस्ते हे अरूंद असून, या सर्व्हिस रस्त्यावरून चारचाकी दोन वाहने एकावेळी जाणे अशक्य आहे. त्यामुळे एसटीचे ड्रायव्हर हे एसटी बसस्थानकात आणण्यास नाखुष असतात. या सर्व्हिस रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी व या कोंडीतून मार्गक्रमण करून बसस्थानक गाठणे बसचालकाला जिकिरीचे होते. परिणामी पुणे, मुंबई कडे जाणार्‍या लांब पल्याच्या एसटी बसस्थानकात न येता त्या महामार्गावरच थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांना महामार्गावरील थांब्याचाच आधार घ्यावा लागत आहे. 

उंब्रज येथे उड्डाण पूल करण्याऐवजी भरावा पुल केल्यामुळे उंब्रज गावचे दोन भाग झाले. त्यामुळे विभागातील महत्त्वाची असलेल्या या बाजारपेठेचे दोन भाग पडल्याने त्याचा परिणाम व्यापार व व्यावसायावर झाला. त्यामुळे उंब्रजला महामार्गाचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच लांब पल्याच्या एसटी बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस यामध्ये महामार्गावरच उभे राहून एसटीची प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.