Sat, May 30, 2020 09:57होमपेज › Satara › जुन्या आरटीओ चौकात तातडीने उपाययोजनांचे सीओंना आदेश

‘पुढारी’ वृत्ताची राज्यमंत्र्यांकडून दखल

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:10PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक शाहू स्टेडिअममार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या जुन्या आरटीओ ऑफिस  चौकातील वाहतूक धोकादायक होत असल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांनी त्याची तातडीने दखल घेत याबाबत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत. 

सातारा शहरात अनेक अपघातग्रस्त ठिकाणे आहेत. त्यामध्ये जुन्या आरटीओ ऑफिसशेजारील हा चौेक अपघाताला कायमच निमंत्रण देवू लागला आहे. येथील धोकादायक वळण वाहनचालकांची मती गुंग करत आहे. अरुंद रस्ता व त्यावरील अचानक लागणारे वळण, परिसरात झालेली छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची अतिक्रमणे, विस्तारलेले वृक्ष यामुळे हा परिसर वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’ने  दि. 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते.

‘जुना आरटीओ ऑफिस चौक डेंजरझोन’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या या वृत्ताची दखल नगरविकास राज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांनी तातडीने घेतली. त्यांनी सातारा पालिका मुख्याधिकार्‍यांना आदेश दिले असून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल  नगरविकास खात्याला  सादर करण्यात यावा, असेही याबाबतच्या आदेशात ना. डॉ. रणजित पाटील यांनी म्हटले आहे.

जुना आरटीओ ऑफिस चौक गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीला धोकादायक झाला आहे. आता नगरविकास राज्यमंत्र्यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना केल्यानंतर तरी या चौकातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होणार का? याकडे सातारकरांसह तमाम वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

या चौकातील यू आकाराच्या वळणावर वाहनांची व नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ सुरु असते. या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीच्या संदर्भात कोणत्याच उपाययोजना नसल्याने हे वळण दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत आहे. काळानुसार वाहनांची वाढती संख्या व वेग पाहता वाहनचालकांच्या सुरक्षेतेची दक्षता व सुविधा उपलब्ध करुन देणे संबंधित विभागाचे  कर्तव्य आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष होत आहे.  आता नगरविकास राज्यमंत्र्यांनी मुख्याधिकार्‍यांना आदेश  दिल्यामुळे सातारकर नागरिकांनी दै. ‘पुढारी’ व नगरविकास मंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत.