होमपेज › Satara › सातार्‍यात वाहतुकीचे वाजलेत तीन तेरा

सातार्‍यात वाहतुकीचे वाजलेत तीन तेरा

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 10:53PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

सातारा शहरातील रस्त्यांच्या तुलनेत चारचाकी व दुचाकींचा रस्त्यावरील ताण वाढला असून  वाहतुकीचे प्रश्‍न गंभीर बनू लागले आहेत. गोडोली चौक, मोती चौक या दोन ठिकाणी तर वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून दररोजच येथे वाहनांची धडकाधडकी सुरू आहे. सद्यस्थितीला येथे सिग्नल असणे अत्यावश्यक बनले आहे. दरम्यान, केवळ धूम बाईक राईडर्स, अवैध दारु, गौणखनिज वाहतूक, पळून जाणारे चोरटे यांच्यावरही वाहतूक पोलिसांनी तीव्र कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

सातार्‍याला प्रामुख्याने दोनच मुख्य रस्ते समजले जायचे. मात्र, अलिकडच्या काळात सातारा व उपनगरांचा झपाट्याने विस्तार होवून शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण येवू लागला आहे. अपुर्‍या जागेमुळे एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवल्यानंतर तो आता सातारकरांच्या हळूहळू सवयीचा होत चालला आहे. महामार्गावरुन शहरात आत येण्यासाठी अनेक प्रवेशद्वार असल्याने सातार्‍यातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यातच शहरातील वाढते अतिक्रमण यामुळे वाहन पार्कींग व किमान रस्त्यावरुन चालवण्यासाठी  वाहनाला लागणारी जागा यावरुन वाहन चालकांची अक्षरश: कोेंडी होत आहे.

जिल्ह्याचे ठिकाण असणार्‍या सातारकरांच्या दुर्देवाने पोवई नाका व जिल्हा परिषद चौक या दोनच ठिकाणी सिग्नलची सोय आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे या दोन्ही ठिकाणच्या सिग्नलमध्ये वारंवार बिघाड होत असतो त्यामुळे वाहन चालकांची गोची होते व पोलिसांची त्रेधातिरपीट होते. पार्कींगच्या बाबतीतही वाहने लावायला जागा नसल्याने व स्थानिक प्रशासनाची अनास्था असल्यामुळे पार्कींग हा जटील प्रश्‍न होवून बसला आहे.सातार्‍यातील वाहतुकीचे अशा तीनतेरा वाजले असतानाच वाहतूक पोलिसही केवळ नो इंट्रीतून येणारी वाहने, पार्कींगमध्ये नसणारी वाहने यांच्यावरच कारवाईत करण्यात मश्गूल असतात. यामुळे वाहतूक पोलिस व वाहन चालक यांच्यामध्ये दररोज तापातापी होत असते. शहरात बिनधोकपणे धूम बाईकर्सची ब्रूंग ब्रूंग अद्याप सुरुच आहे. याशिवाय अवैध दारु वाहतूक, चोरीच्या चारचाकी व दुचाकीवरुन येणारे चोरटे यांच्याकडे वाहतूक पोलिसांचे साफ दुर्लक्ष असते. सातार्‍यात जिथे जिथे एसटीचे थांबे आहेत त्याठिकाणी रिक्षा चालक, वडाप या वाहनोची बिनधोकपणे रेटारेटी सुरु असते. दिवसा व रात्रीच्यावेळी बसस्थानक परिसरातही ट्रॅव्हल्स, खासगी वाहन चालक प्रवाशांची वडाप करत असतात. पोलिस मात्र गांधारीच्या भूमिकेत असतात. यामुळे पोलिसांनी सरसरकट सर्वांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

नियुक्‍ती सातारा अन् बंदोबस्ताला बाहेर..

सातारा शहरातील वाहतूक नियंत्रणसाठी एका अधिकार्‍यासह 33 वाहतूक पोलिसांची नियुक्‍ती आहे. यातील साप्‍ताहिक, सीक  रजा असे पोलिस वगळून दररोज साधारण 18 ते 20 जण प्रत्यक्ष ड्युटीवर असतात. मात्र सातार्‍यातील महामार्ग, महाबळेश्‍वर पर्यटन, यात्रा, जत्रा, इतर बंदोबस्त याची बेरीज-वजाबाकी केली तर शहरात याच 33 पैकी कधीकधी 4 ते 5 एवढेच पोलिस ड्युटीसाठी असतात. वर्षभरात अशी सुमारे 4 ते 5 महिने स्थिती असल्याचेही समोर आले आहे. यामुळे नियुक्‍ती वाहतूक विभाग पण ड्युटीला बाहेर असा सिलसिला पोलिस कर्मचार्‍यांचा आहे.

‘वाहतूक’ला लॅन्डलाईन फोनच नाही..

सातारा ट्राफिक कार्यालयाला लॅन्ड लाईन फोनही नसल्याची माहिती समोर आली असून यामुळे नियोजनाचा अभाव व वाहतूक पोलिसांना ऐकमेकांना संपर्क साधण्याचे अवघड होवून बसते. बाहेरुन आलेल्या वाहन चालकाची गाडी क्रेनने उचलून नेल्यानंतर अनेकदा त्यांना वाहतूक विभाग कार्यालय माहित नसते. गाडी क्रेनने उचलून नेली की चोरीला गेली यावरुन वाहन चालकांचा गोंधळ उडत असतो. अशी तक्रार आल्यास  दुुचाकीबाबत किमान लॅन्ड लाईन फोनवरुन त्याबाबतची माहिती घेता येणे शक्य असल्याचे लॅन्ड लाईन फोन विभागात  असणे गरजेचा बनले आहे.