Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Satara › नवरीचीही उंटासह घोड्यावरून होतेय सवारी

नवरीचीही उंटासह घोड्यावरून होतेय सवारी

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:55PMकण्हेर : बाळू मोरे

सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु असून बदलत्या काळानुसार या मंगल कार्यात अनेक नवनवे फंडे येवू लागले आहेत. अलिकडे नवरी मुलीच्या गावदेव मिरवणुकीसाठी घोडे व बँड यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे.  हौसेला काही मोल नाही, याचा प्रत्यय अनेक लग्न समारंभामध्ये येवू लागला असून गावदेव पायापडणीला मिरवणुकीमध्ये नवरीसाठी एक नव्हे तर तब्बल तीन घोडे व उंटांची स्वारी नुकतीच पहायला मिळाली. 

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही गावदेवला मुलगी घोड्यावरुन काढणे या प्रथांना प्राधान्य देण्यात येत आहे. नवरीला नऊवारी साडी व फेटा, कमरेला तलवार हा वेश परिधान केला जात आहे. झाशीच्या राणीच्या वेशातील नवरीची गावदेव मिरवणूकही हौशी पालकांकडून  केली जात आहे. यामध्ये पालकवर्ग व पाहुणेमंडळीही मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसत आहेत. लग्न म्हटलं की हौसेला मोजमाप नाही. विशेषत: मुलींची हौस लग्नामध्ये केली जात असल्याने हा उत्साहाचा सोहळा आला आहे. काही पालकमंडळीही कर्ज काढूनदेखील मुलीची हौस पुरवताना दिसत आहेत.

गावदेवतच्या पायापडणीला नवरी घोड्यावर तर मिरवणुकीत शेजारी दोन घोड्यांवर वेशभूषा केलेले मराठी मावळे व मागे उंटाची स्वारी, बँड व फटाकेंच्या आवाजात गावातून मिरवणूक काढल्याने मुलगी पाहिजे या संदेशाचे वातावरणही मिरवणुकीत दिसून येत आहे.  लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी नवरा असो वा नवरी, गावदेवाला जाण्याची पद्धत सर्वत्र आहे. 

पूर्वी गावदेव म्हटलं की नवराच फक्त घोड्यावरुन जात असे. परंतु पारंपारिक पद्धतीला छेद देत बदल होताना दिसून येत आहे. गावातील प्रत्येक देवाला लग्नाला येण्याचे निमंत्रण देवून पाया पडण्यासाठी नवरी घोड्यावरुन जाताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. 

झाडे देऊन मान्यवरांचे स्वागत....

वधू-वराला शुभाशीर्वाद देण्यासाठी लग्न समारंभात मान्यवरही उपस्थितीत असतात. यामान्यवरांचे स्वागत श्रीफळ देवून करण्यात येते. परंतु या परंपरेला बगल देत मान्यवरांच्या स्वागतासाठी श्रीफळ ऐवजी झाडे देऊन स्वागत करण्याकडे अनेक ठिकाणी कल दिसून येत आहे. यामुळे समारंभात पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावा हा संदेश देऊन लोकांमध्ये जनजागृती होत आहे.