Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Satara › कराड वाढीव हद्दीत टाऊन प्लॅनिंग योजना

कराड वाढीव हद्दीत टाऊन प्लॅनिंग योजना

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 10:59PMकराड : प्रतिनिधी 

कराडच्या वाढीव हद्दीमध्ये नगररचना विकास योजना (टीपी) राबवली जाणार आहे. यामध्ये कोणीही भूमिहिन होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही अशाप्रकारची नगररचना योजना करण्यात येणार असून 70 टक्के शेतकर्‍यांची सहमती व 50 टक्के जमीन मिळणार असेल तरच ही स्किम राबवण्यात येणार आहे. मात्र, या योजनेमुळे नागरिक तसेच नगरपालिका यांना याचा फायदा होणार आहे. टीपी प्रसिध्द होण्यापूर्वी याबाबत नागरिकांशी चर्चा करून त्यानंतर या योजनेबाबतचे पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचना सहसंचालक  अविनाश पाटील यांनी दिली. 

येथील हद्द वाढीतील वाखाण परिसरामध्ये टी. पी. स्किम राबविणेबाबतचे शासनाचे धोरण असून  टी.पी. स्किम योजना तयार करणे, त्याची पद्धती, त्यातून मिळणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्याकरीता नगररचना सहसंचालक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या नगरसेवक, नागरिकांच्या बैठकीत त्यांनी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरअभियंता एम. एच. पाटील, नगरसेवक, नगरसेविका तसेच वाढीव हद्दीतील नागरिक यांची उपस्थिती होती. 

या योजनेमध्ये नागरिकांना आपली जमीन 50 टक्के द्यावी लागणार आहे. नागरिकांचा सहभाग व नगरपालिकेला शासनाच्या नगररचना विभागाकडून मिळणार्‍या निधीतून सोयी सुविधा मिळणार आहेत. योजना राबवण्यापूर्वी नागरिकांशी याबाबत चर्चा केली जाणार आहे. कोणाचीही जमीन जबरदस्तीने घेतली जाणार नाही. तसेच या योजनेमुळे कराडचे महत्व वाढणार आहे, नगरपालिकेचा आर्थिक स्त्रोत वाढणार आहे. नागरिकांना रस्ते, गटारी आदी सुविधा चांगल्याप्रकारे मिळणार आहेत. तसेच ज्यावेळी एखाद्याची जमिनमालकाची जमीन 100 टक्‍के जाणार असेल त्याचवेळी त्याच्याशेजारची निम्मी जमीन त्याला देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाचेच नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. याबाबत सर्वांना समान न्याय दिला जाणार आहे. योजना राबवताना कोणतीही अडचणी निर्माण होईल अशा पध्दतीने योजना राबवण्यात येणार नाही. काही शहरांमध्ये या योजनेतील रस्त्यांचे काम अपुरे राहिल्यावर त्या भागातीला लोकप्रतिनिधींचा सहभाग घेवून रस्ते तयार करण्यात आले आहेत. ही योजना कालबध्द व्हावी यासाठी कायदा आहे. त्यामुळे त्याच कालावधी योजना करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. 

डीपी व टीपी मधील फरक विषद केला

यापूर्वी वाढीव हद्दीमध्ये विकास योजना (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करून ती शासनाकडून  जून 2017 मध्ये अंशत: मंजूर झालेली आहे. नगरविकास योजनेबबात शहरातील नागरिक नाराज आहेत. यावेळी अनेकांच्या जमिनी गेल्या होत्या त्याबाबत नागरिकांनी यावेळी आपली कैफियत मांडली. त्यामुळे ही योजना झाली तर पुन्हा त्याच झळा नागरिकांना सोसाव्या लागणार की काय असा प्रश्‍न नागरिकांना निर्माण झाला होता. त्यामुळे या योजनेबाबत नागरिकांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते. मात्र अविनाश पाटील यांनी नागरिकांच्या शंका दूर केल्या. विकास योजना (डीपी) व नगररचना  विकास योजना  यामध्ये फरक  असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी अहमदनगर, चाकण शहराच्या टीपी योजनेची माहिती दिली.

नागरिक, नगरसेवकांच्या शंकांचे निरसन

अविनाश पाटील यांनी  टीपी स्किमची माहिती दिल्यानंतर नागरिकांनीही आपले प्रश्‍न मांडावेत असे आवाहन केल्यावर अनेक नागरिकांनी या योजनेबाबत नाराजी व्यक्‍त करून आपली जमीन आणखी कितपत जाणार याबाबत शंका निर्माण केल्या. यावेळी नगरसेविका स्मिता हुलवान यांनी  या योजनेत निम्मीच कामे केली जातात उर्वरित कामे होत नाहीत तसेच योजना पूर्ण व्हायला वेळ गेल्यास पुढील जनरल बॉडी आल्यानंतर नागरिकांना त्यांचे प्रश्‍न मांडताना अडचण येते. त्यामुळे या योजनेवर शासनाचा अंकुश रहावा, योजनेसाठी कालबध्दता निश्‍चित आहे का असे प्रश्‍न विचारले. त्याचबरोबर नगरसेवक फारूक पटवेकर, विजय वाटेगावकर यांनीही अनेक प्रश्‍न उपस्थित करून माहिती घेतली.