Wed, Jul 24, 2019 14:31होमपेज › Satara › सलग सुट्ट्यांनी महाबळेश्‍वर बहरले

सलग सुट्ट्यांनी महाबळेश्‍वर बहरले

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 10:45PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

थंड हवेचे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्‍वर सध्या गुलाबी थंडीने पर्यटकांना आकर्षित करत आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांनी महाबळेश्‍वर गजबजून गेले आहे. पर्यटक  गुलाबी थंडी व येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेताना पहावयास मिळत आहेत.

सलग सुट्ट्यांमुळे  महाबळेश्‍वरला पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. येथे थंडीचा कडाका वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टी सौंदर्य पाहावयास मिळत आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचा कडाका जाणवत असून महाबळेश्‍वरपासून काही किमी अंतर खाली गेल्यास काही भागांमध्ये बोचरी थंडी असते. मात्र, येथे गुलाबी थंडी असून या गुलाबी थंडीचा पर्यटक अनुभव घेताना दिसत आहेत.

मुख्य बाजारपेठ या सुट्ट्यांंमुळे गजबजून गेली आहे. बाजारामध्ये फिरताना पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून येत आहेत. थंडीमुळे मका कणीस, पॅटिस, भजी, चहा यासारख्या पदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत. केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, क्षेत्रमहाबळेश्‍वर, लॉडविक पॉईंट, प्रतापगड या प्रेक्षणीय स्थळांवर मोठी गर्दी होताना दिसत आहे. याबरोबरच सूर्योदयासाठी प्रसिद्ध विल्सन व सूर्यास्तासाठीच्या मुंबई पॉईंटवर गर्दी होत आहे.

ऑर्थरसीट, केट्स, लॉडविक या प्रेक्षणीय स्थळांसह अत्यंत नयनरम्य असलेल्या माचूतर गणपती मंदिरामागील प्लेटो (राजाची खुर्ची) व लिंगमळा धबधबा ही पर्यटनस्थळेही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. प्रेक्षणीय स्थळांसह श्री क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होत आहे. किल्ले प्रतापगड व हस्तकला केंद्र येथे पर्यटक आर्वजून भेट देत आहेत. थंडीत देखील पर्यटक येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईसक्रीम, आईस गोळ्यावर ताव मारताना दिसत आहेत. वेण्णालेक, मुंबई पॉईंट या परिसरामध्ये घोडेसवारीचा आनंद लुटताना पर्यटक लुटत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या अधिक असून सध्या सहली देखील मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत. 

नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक गर्दीने फुलून गेले असून पर्यटक नौकाविहारासोबतच चमचमीत चटपटीत पदार्थांवर ताव मारत आहेत. येथे काही ठिकाणी एकेरी वाहतूक तर काही ठिकाणी प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात आहेच.