Mon, Apr 22, 2019 16:22होमपेज › Satara › टुरिंग टॉकीज ते मल्टीप्लेक्स थिएटर..!

टुरिंग टॉकीज ते मल्टीप्लेक्स थिएटर..!

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:04PMसातारा : सुनील क्षीरसागर

1970-75चा तो काळ... गावागावांत मुंबई आली बघा..., फिलम् स्टार बघा... असे करत आरोळी देत एक जोकरसारखा माणूस यायचा. त्याच्या सायकलवर सिनेमाचं जग दाखवणारं चमत्कारिक मशिन असायचं. हे मशिन ओरडत ओरडत तो माणूस सायकलवरून खाली उतरून चौकात मांडायचा. त्याला बिस्किटाच्या डब्यासारखे डबे जोडलेले असायचे. डब्याच्या झाकणासारखे झाकण उघडले की ते सिनेमाचं अवघं विश्‍व त्या डब्यात दिसायचं. पाच पैसे, दहा पैसे, तीन पैसे, दोन पैशात सिनेमा नटी बघा, सिनेमा नट बघा असा तो माणूस ओरडायचा. गावातील बालगोपाळ घरातून पाच पैसे, दहा पैशासाठी आई-बाबांकडे हटून बसायचे.  पैसे मिळाले की धावत, पळत ती मुंबई बघायला सुटायचं. डब्याच्या झाकणासारख्या गोल तोंडाला बहिर्गोल भिंगासारखं भिंग असायचं.  त्या विनोदी वेषातला माणसाच्या त्या चमत्कारिक मशिनमध्ये हिंदी सिनेमातील नट-नट्यांची पोस्टर्स असायची. ती पोस्टर्स एकेक  करत तो मशिनमध्ये खाली-वर सरकवायचा आणि बाळगोपाळांना हेच फोटो एखाद्या चित्रपटासारखे वाटून बाळगोपाळ जोराने ओरडत हरकून जायचे. मी धमेंद्र बघितला, मी अमिताभ बच्चन पाहिला, हेमा मालिनी  पाहिली..., राणीचा बाग पाहिला..., चौपाटी पाहिली असे त्या  बाळगोपाळातील एखादा दांडगट मुलगाही फिल्म पहात पहात म्हणायचा...

  पुढे  मराठी चित्रपटांचे ‘प्रभात’ युग अवतरले.  शंभर नंबरी सोन्यासारखे हे मराठी चित्रपटांचे दिवस माणसाला अचंबित करून गेले. गावागावांतून मराठी तसेच हिंदी चित्रपटही मशिनच्या सहाय्याने रस्त्यावर पडदा बांधून दाखवायला सुरूवात झाली. त्या काळात गाव पातळीवर असणारी तरूण पोरे एकत्र येऊन गावातील नाटकांच्या तयारीसाठी किंवा व्हॉलीबॉल, क्रिकेटचे साहित्य आणण्यासाठी, शाळेची पुस्तके आणण्यासाठी असे चित्रपट तिकिटावर आयोजित करत. त्यासाठी लागणारे पडदे, कनातीसाठी लागणारे कळक आदी साहित्य जमवून तंबूसारखी कनात स्वत: ठोकत. चारी बाजूंनी कनात ठोकून झाली की तरूण पोरांमधील काही शिकणारी पोरे तिकिट फाडायला बसत तर काही कनातीजवळच्या एकेका खांबाजवळ कोण उपटसुंभ चित्रपट पाहण्यासाठी फुकट घुसू नये म्हणून  वॉचमनसारखी ड्युटी बजावत. रात्रीच्यावेळी गावातील सर्व बायका-मुली, महिला, वृद्ध माणसे पडद्यावरील हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत. त्यासाठी असणारे एक-दोन रुपयांचे तिकिट काढून सिनेमा पाहिला जात असे.  एका बाजूला महिला वर्ग तर दुसर्‍या बाजूला पुरूष वर्ग बसलेला असायचा. शहरातून चित्रपटाची रिळे आणि मशिन घेऊन येणारा मालक किंवा त्याची पोरे ऐटीत खुर्चीत बसून हा सिनेमा गावकर्‍यांना दाखवत. त्यासाठी पैसे मोजले जात आणि सर्व खर्च भागवून उरलेला पैसा ही तरूण मुले गोळा करून त्यामधून आपली खेळाची व शिक्षणाची भूक भागवत असत. त्याकाळी गावातील तंबूतील चित्रपटही हाऊसफुल्ल होत असे. जय संतोषी माँ, थापाड्या, सोंगाड्या, हर्‍या-नार्‍या, पिंजरा, टिळा लाविते मी रक्ताचा, जैत रे जैत, सोनारानं टोचलं कान, वारणेचा वाघ, पवनाकाठचा धोंडी, सांगते ऐका, एक गाव बारा भानगडी, मोहित्यांची मंजुळा, वहिनीच्या बांगड्या, संत तुकाराम, किचकवध असे असंख्य मराठी चित्रपट त्याकाळी गावोगावी हाऊसफुल्ल झालेले पाहिले. त्याकाळी गावातील कनातीमध्ये बंदिस्त असलेला हा चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच आनंद होता. 

शहरातील थिएटर्स बनली आकर्षण...

 शहरातून थिएटर ही संकल्पना अस्तित्वात आली आणि चित्रपट खर्‍या अर्थाने श्रीमंत झाला असे म्हणावे लागते. बसायला खुर्च्या, बाल्कनी, अप्पर, स्टॉल असे अंतरानुसार  तसेच बाराखडीनुसार (ए, बी, सी, डी)  बसण्याची आधुनिक संकल्पना या थिएटरने आणली तसेच  मॉर्निंग, मॅटिनी, रेग्युलर असे दिवसाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतील चित्रपटांच्या वेळाही अस्तित्वात आल्या.  1970-80च्या दशकात अनेक मराठी, हिंदी चित्रपटांची लाट आली. चांगले चित्रपट पाहण्यासाठी ब्लॅकने तिकिट ही संकल्पना अस्तित्वात आली. शहरातील थिएटरमधून तिकिटे खरेदीसाठी रांगा लागू लागल्या. राज्यभर प्रत्येक शहरात चार-चार, सहा-सहा थिएटर असत.  गाजलेल्या सिनेमांनी तर इतिहास घडवला. ‘सिल्व्हर ज्युबिली’, ‘गोल्डन ज्युबिली’ही अनेक चित्रपट ठरले. ‘शोले’ सारख्या चित्रपटाने मुंबईमध्ये मिनर्व्हा टॉकिजला इतिहास घडवला. मराठीतील ‘सांगते ऐका’ चित्रपटानेही काळ गाजवला. ‘शोले’ सलग पाच वर्षे ‘मिनर्व्हा’ला होता, असे मुंबईहून येणार्‍या त्या काळातील दर्दी रसिकांनी सांगितल्याचे स्मरते. मिनर्व्हा टॉकिजच्या परिसरात असणारी खाद्यपेये, वडापावचे गाडे, पानाच्या टपर्‍यांनी अभूतपूर्व कमाई केल्याचे ऐकण्यात आले होते. ‘सांगते ऐका’बाबतही असाच इतिहास पुण्यात घडल्याचे चित्रपटाचे जाणकार सांगतात. ‘संत तुकाराम’ या चित्रपटानेही तो सुवर्णकाळ अनुभवला. परदेशातील चित्रपटगृहातही या चित्रपटाने बाजी मारली होती. 

शहरातील थिएटरमधील नव्या चित्रपटांना लागणार्‍या रांगा, तिकिटे मिळवण्यासाठी होणारी मारामारी, इंटरव्हलवेळी चहा, सिगारेटसोबत होणार्‍या गप्पा, चित्रपट पहायला आलेले बावरलेले नवविवाहित जोडपे आणि चित्रपट संपल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडणारे चित्रपट रसिकांचे लोंढे आज थिएटरप्रमाणेच काळाच्या ओघात हरवून गेले आहेत...


आता  एका क्लिकवर हॉलिवूड ते बॉलिवूड 

 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर माहितीचा विस्फोट होत आहे. एकेक थिएटर कॉम्प्लेक्स, मल्टीप्लेक्स, मॉलच्या कोलाहालात आपले अस्तित्व हरवून बसले आहे. आता प्रत्येकाच्याच हातात हजारो चित्रपटांचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे. एका क्लिकवर परदेशातील हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतचा पाहिजे तो सिनेमा तो पाहू शकतोय. घरोघरी होम थिएटरची संकल्पना अस्तित्वात आली आहे. मल्टीप्लेक्सने अवघी शहरे हरवून गेली आहेत. पण... हजारो दर्दी रसिकांच्या साक्षीने चित्रपट पाहण्याचा तो ‘भावानंद’ आता नव्या पिढीला मिळेल का..?

मोठ्या यात्रांमध्ये टूरिंग टॉकीजचा प्रवास...

  पालीच्या खंडोबाची यात्रा, ब्रह्मपुरी यात्रा, औंध यात्रा या सातारा जिल्ह्यातील त्या काळात भरणार्‍या मोठ्या यात्रा असायच्या. पुढे पुसेगावची यात्राही मोठी भरू लागली. या यात्रेमध्ये टूरिंग टॉकिजचा जमाना सुरू झाला. गावातील कनातीपेक्षा या यात्रांमधून अवतरणार्‍या चित्रपट मालकांच्या कनाती मोठ्या दणकट असायच्या. एकावेळी दीड दीड, दोन दोन हजार प्रेक्षक या चित्रपटासाठी जमायचे. यात्रेसाठी हजारो माणसे यायची. ही माणसे तीन ते चार टूरिंग टॉकीजमध्ये सामावली जायची. त्यावेळी चित्रपटांची आकर्षक  पोस्टर्स दिलखेचक असायची. माईकवरूनही  सिनेमाच्या जोरदार जाहिराती व्हायच्या. अनौन्समेंट व्हायची. चित्रपटातील नायकांची नावे पब्लिकची दिलखेचक गर्दी करायची. हजारोंनी पैसा त्या काळात यात्रांमधून  थिएटर मालकांनी मिळवला. दिवसभर देवदर्शन, यात्रेतील खरेदी झाली की रात्री जेवण करून तमाशा  थिएटर अथवा चित्रपटांना माणसे हजेरी लावत. या यात्रांना बैलगाड्या सजवून घरोघरची माणसे जायची. आख्खं कुटुंब पाहुण्यारावळ्यासह  थिएटरमध्ये हजेरी लावायचं. रात्रीच्यावेळी नदीच्या वाळवंटात अथवा एखाद्या मोकळ्या माळरानावर थिएटरमध्ये झालेले हे सिनेमे बरेच भाव खावून गेले. काही चित्रपटांचे प्रीमियर शोही यात्रेतील टूरिंग टॉकिजमधून झाल्याचे चित्रपटाचे दर्दी जाणकार आजही सांगतात. चित्रपटातील प्रसंगावर भान हरपून जाण्याइतपतचा तो काळ सुवर्णकाळ होता, असे त्या काळातील दर्दी जाणकार सांगतात. 

सिनेमावेड्यांची मंदिरे

कराड : प्रतिभा राजे 

हिरो, हिरॉईन यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण असणारा तो काळ होता.आजही याबद्दल आकर्षण असले तरी त्यावेळी केवळ तीन तासांच्या  चित्रपटामध्येच त्यांना पहावयाची संधी मिळत होती. या चित्रपटगृहांना हल्लीसारखी इतर कोणतीच ऑप्शन नसायची. त्यामुळे चित्रपटगृहे म्हणजे सिनेमा भक्तांची मंदिरे असायची. 

प्रत्येक गुरुवारी उद्या कोणता नवीन चित्रपट लागणार तर  शुक्रवारी सकाळीच चित्रपटागृहाकडे धाव घेणारे त्यावेळचे गल्लीगल्लीत हिरो दिसायचे. नव्या चित्रपटात हिरो, हिरॉईन कोण असेल याची प्रचंड उत्सुकता असायची. दर आठवड्याला आवडत्या हिरो, हिरॉईनचे दर्शन केवळ चित्रपटगृहेच  देत असत.  चित्रपटगृहाच्या बाहेर चित्रपटाचे लावलेले मोठे  पोस्टर म्हणजे फिल्मप्रेमींसाठी मोठा खजानाच असायचा. विशेष म्हणजे या पोस्टरलाही कोणतेही ऑप्शन हल्लीसारखे नसायचे. त्यामुळे चित्रपटगृहाबाहेरील पोस्टरवरील नायक, नायिकांची छबी तासन्तास न्याहाळणारे फिल्मप्रेमी दिसायचे. त्याकाळात फिल्म दिवाने असणे म्हणजे एखादा अपराध केल्यासारखे वाटायचे. त्यामुळे हे फिल्मप्रेमी त्याकाळच्या समाजासाठी चेष्टेचा विषय ठरत असले तरी सिनेमा पाहण्याची भूक चित्रपटगृहेच भागवत असत. आवडत्या हिरो, हिरॉईनचा किंवा गाजलेला चित्रपट पाहण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन लोक चित्रपटगृहामध्ये पिक्चर पहायचे. हातातील पुड्यामधील  कुरमुरे खात  मोठ्या पडद्यावरील चित्रपट पाहणे म्हणजे पर्वणीच असायची. परीक्षा संपल्या  की त्याचे सेलिब्रेशन व्हायचे ते या चित्रपटगृहांमध्येच. वाढदिवस असो, कोणी कोणाशी लावलेली बेट असो त्याचं बक्षीस म्हणजे सिनेमागृहेच, असे गृहितच ठरलेले असायचे. इतकं महत्त्व सिनेमागृहांना होतं. हल्ली व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक आदी सोशल मीडियामुळे हिरो, हिरॉईनचे दर्शन सहज उपलब्ध होतेय. कोणताही चित्रपट कधीही, कोठेही, केव्हाही पाहता येतोय. त्यामुळे चित्रपटगृहांची गरज फारशी राहिली नाही. काल रिलीज झालेले