सातारा : प्रतिनिधी
सुरुचि राडा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी सरकार पक्षाने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागून घेतल्याने बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. ही सुनावणी आता दि. 13 रोजी होणार आहे. दरम्यान, आमदार गटातील कार्यकर्त्यांनी नियमित जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
कोजिागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी येथील टोलनाका ताब्यात घेण्यावरुन खा. उदयनराजे भोसले गट व आ.शिवेंद्रराजे भोसले गटात रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरुचि निवासस्थानासमोर राडा झाला होता. याप्रकरणात एकूण तीन तक्रारी दाखल झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते सातारा शहरातून पसार झाले. दीड महिन्यात पोलिसांनी दोन्ही गटातील आतापर्यंत सुमारे 25 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
आमदार गटाचे अटक असणार्या व पसार असणार्या काही कार्यकर्त्यांंनी नियमित व तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. सातारा जिल्हा न्यायालयाने दोन्ही अर्ज फेटाळल्यानंतर पसार असणार्या कार्यकर्त्यांनी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने तो मंजूर केल्यानंतर दि. 29 रोजी पुढील सुनावणी होती. मात्र आता ही सुनावणी दि. 13 रोजी होणार आहे.
दरम्यान, नियमित जामीन अर्ज फेटाळलेल्या कार्यकर्त्यांचेही उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. केवळ आमदार गटाचेच अर्ज दाखल झाले असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज दाखल असलेल्यांमध्ये हर्षल चिकणे, चेतन सोलंकी, अनिकेत तपासे, निखिल वाडकर, निखिल सोडमिसे, प्रतीक शिंदे, उत्तम कोळी, प्रताप क्षीरसागर अशी त्यांची नावे आहेत.