Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Satara › पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद

पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:11PMसातारा : प्रतिनिधी

आरक्षणासह प्रमुख मागण्यांसाठी  सकल मराठा समाज बांधवांनी राज्यभरात तब्बल 58 मूक मोर्चे काढले. तरीही समाजाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे समाज बांधव रस्त्यावर उतरले असून, राज्यात ठिकठिकाणी हा प्रक्षोभ बाहेर पडला आहे. परंतु, या आंदोलनात प्रत्येकाचे मतप्रवाह वेगवेगळे आहेत. त्यामुळे एक अशी आंदोलनाची दिशा ठरलेली नाही. त्यासाठीच पुणे येथील रेसिडेन्सी क्लब येथे रविवारी दुपारी 1 वाजता खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, मोठ्या संख्येने हा समाज रस्त्यावर उतरला आहे. मूक मोर्चे काढल्यानंतरही आरक्षण न मिळाल्याने दुसरे पर्व म्हणून ठोक मोर्चाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे सरकार जागे झाले असून, सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असले तरी मराठा समाजातही अनेक मतप्रवाह आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समन्वयक वेगवेगळ्या ठिकाणी आपली मते मांडत असल्याने आंदोलनाला दिशा राहिलेली नाही. यासाठी सकल मराठा समाजाच्या हितासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवून एकत्र एका व्यासपीठावर येण्याची गरज आहे. 

त्यासाठीच खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषेदत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांनी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील समन्वयकांनी या परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.