Thu, Apr 25, 2019 03:47होमपेज › Satara › कराडात आज हिंदू एकताचे उपोषण

कराडात आज हिंदू एकताचे उपोषण

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:38PMकराड : प्रतिनिधी 

लोकशाही मार्गाने आम्ही हिंदू समाजात लव्ह जिहादविरुद्ध पदयात्रा काढणार होतो. मात्र, अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर घाला घालत लोकशाहीचा अवमान करत परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आज आम्ही कराडमध्ये लाक्षणिक उपोषण करणार आहोत. सायंकाळपर्यंत परवानगी न मिळाल्यास आम्ही हे उपोषण पदयात्रेला परवानगी मिळेपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा इशारा हिंदू एकता आंदोलन समितीचे प्रांताध्यक्ष नगरसेवक विनायक पावसकर यांनी दिला आहे.

हिंदू एकता आंदोलन समितीकडून शनिवार आणि रविवार, अशी दोन दिवस कराड ते सातारा, अशी लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रा काढण्यात येणार होती. या पदयात्रेला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर प्रशासनाचा विशेषत: पोलिस अधीक्षकांचा मान राखत कायद्याचे पालन करणार असल्याचे सकाळी 10 वाजता दत्त चौकात उपोषण सुरू करणार असल्याचे पावसकर यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले. 

दरम्यान, या पदयात्रेचा कोणत्याही धर्माशी संबंध नव्हता. तरीही काहींनी भिमा कोरेगाव घटनेचे कारण पुढे करत पोलिसांना या पदयात्रेबाबत तक्रार अर्ज दिले. त्यामुळे पोलिसांनी दबावाखाली परवानगी नाकारली आहे. ही पदयात्रा हिंदु समाजातील आमच्या माता - भगिनींच्या रक्षणासाठी काढण्यात येणार होती. त्यामुळे आम्ही आमच्या माता - भगिनींचे रक्षण करायचे नाही का? असा प्रश्‍नही पावसकर यांनी उपस्थित केला. प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा दावा करत प्रत्येक वेळी हिंदू सणांवेळीच कायद्याची अंमलबजावणी कशी होते? असा संतप्‍त प्रश्‍न उपस्थित करत या पदयात्रेची तयारी चार महिन्यांपूर्वीपासून सुरू होती.

29 आणि 30 नोव्हेंबर 2017 ला हिंदू एकताचे 50 कार्यकर्ते कराडमधून सातार्‍यात चालत गेले होते. भिमा कोरेगावच्या घटनेपूर्वी आम्ही पदयात्रेसाठी परवानगी मागितली होती. आमची पदयात्रा होती, मात्र काहींना तो मोर्चा वाटतो आहे. आम्ही कधीही कायदा मोडत नाही. मात्र जे लोक कायदा मोडण्यात पुढे असतात, त्यांना आम्ही कायमच विरोध करत आलो आहोत आणि यापुढे करणार, असेही पावसकर यांनी यावेळी स्पष्ट केले.