खटाव : प्रतिनिधी
विविध कारणांमुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या जिहेकठापूर योजनेसाठी शिवसेनेचे वर्धनगड बोगद्याजवळ आंदोलन सुरु आहे. गुरूवारी दुसर्या दिवशी अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमधील
चर्चेतून तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करत शिवसेनेने शुक्रवारी ‘खटाव तालुका बंद’ची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही बंदला पाठिंबा जाहीर केल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.
खटाव आणि माण या दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्या जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेची रखडलेली कामे त्वरित सुरु करावीत, या मागणीसाठी शिवसेनेचे बुधवारपासून आंदोलन सुरु आहे. योजनेच्या वर्धनगड येथील बोगद्याजवळ शिवसैनिकांनी ठिय्या मारला आहे. गुरूवारी जिहेकठापूर योजनेचे कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकार्यांबरोबर झालेल्या चर्चेतून समाधानकारक तोडगा निघाला नाही. डिसेंबरपर्यंत या योजनेचे पाणी नेर धरणात आणण्याचे नियोजन झाले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले मात्र तसे लेखी दिले नाही. योजनेसाठी आठशे कोटींचा निधी मंजूर झाल्याची टिमकी भाजपकडून गेल्या पाच महिन्यांपासून वाजवली जात आहे. मग कामे का होत नाहीत? असा सवाल सेना पदाधिकारी नरेंद्र पाटील, प्रताप जाधव, भानुदास कोरडे, दिनेश देवकर यांनी उपस्थित केला. अधिकार्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. दुष्काळी जनतेच्या सहनशीलतेचा भाजप सरकार अंत पहात आहे, म्हणूनच आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला.
गुरूवारी वर्धनगड बोगद्याजवळ झालेल्या चर्चेस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, राजू कचरे, बाळासाहेब इंगळे, रामभाऊ जाधव तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानुमते ‘खटाव तालुका बंद’ची हाक देण्यात आली. तालुक्यातील शेतकरी आणि जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.जिहेकठापूर योजनेच्या रखडलेल्या कामासंदर्भात शुक्रवारी आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकार्यांची सातारा विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक जिहेकठापूर योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात पार पडणार आहे.
शिवसैनिकांचा रात्रभर वर्धनगड बोगद्यात ठिय्या ...
शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुसेगाव येथून वर्धनगड बोगद्यापर्यंत पदयात्रा काढली. रात्री सर्वांनी बोगद्यातच ठिय्या दिला. रात्रीचे जेवणही बोगद्यातच करण्यात आले. जिहेकठापूरबाबत ठोस तोडगा निघेपर्यंत बोगद्यातून हटणार नाही, असा पवित्राच शिवसेनेने घेतला आहे.