Mon, Mar 25, 2019 13:39होमपेज › Satara › तंबाखूमुक्तीसाठी ‘नो टोबॅको’ मॅरेथॉन 

तंबाखूमुक्तीसाठी ‘नो टोबॅको’ मॅरेथॉन 

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:34PMसातारा : प्रतिनिधी

क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रूग्णालय, वात्सल्य सामाजिक संस्था, पिपल्स सामाजिक संस्था व कुपर फौंडेशनच्या सहकार्याने सातार्‍यात रविवारी सकाळी नो टोबॅको मॅरेथॉन (तंबाखू मूक्त दौड) काढण्यात आली.

क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रूग्णालयापासून  सकाळी 6 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचा  शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ,  डॉ. अशोक मोरे, डॉ. योगिता शहा, शशिकांत पवार, अजय गायकवाड, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ उमेश मुंडे यांच्यासह  वैद्यकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजात दिवसेंदिवस होत असलेले कर्करोगाचे बळी, तंबाखूच्या व्यसनाला आळा बसावा आणि तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नो टोबॅको मॅरेथॉन विक साजरा केला जात आहे. यानिमित्ताने 3, 5 व 10 किलोमीटर अशी नो टोबॅको मॅरेथॉन (तंबाखू मूक्त दौड) काढण्यात आली. या रनमध्ये सुमारे 1 हजार 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
डॉ. उज्वला माने यांनी स्पर्धकांना  तंबाखू विरोधी शपथ दिली. यावेळी पुढील आयुष्यात तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. यावेळी    सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल व ई प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. 

रुग्णांजवळ डीजे लावून ‘वका वका’चा ठेका..

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाने नो टोबॅको याचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचा राबवलेला उपक्रम निश्‍चित चांगला आहे. मात्र मुख्य उद्देशानंतर थेट डॉल्बीवर धागडधिंगाणा लावून सिव्हील आवारातच बिभत्स डान्स झाल्याने त्याला गालबोट लागलेे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रकारचे रुग्ण आतमध्ये उपचार घेत आहेत. यामध्ये नुकतेच जन्मलेली मुले, गर्भवती स्त्रिया, वृध्द नागरिक यांचा समावेश आहे. मात्र रविवारी सकाळी नो टोबॅको रनच्या नावाखाली डॉल्बी लावून पाश्‍चिमात्य ‘वका..वका..’  हे गाणे मोठ्या आवाजात लावले गेल्याने रुग्णांचा कोणताही विचार केला गेला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासन, आयोजक खरच संवदेनशील आहेत का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. घडलेले कृत्य असंवेदनशील असून याबाबत कारवाई करण्याची मागणीही होत आहे.