Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Satara › मंगळवार, मोती तळ्यांतच विसर्जन व्हावे

मंगळवार, मोती तळ्यांतच विसर्जन व्हावे

Published On: Aug 24 2018 12:48AM | Last Updated: Aug 23 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील नगरसेवक तसेच गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व प्रतिष्ठितांनी गणेश विसर्जनासाठी मंगळवार तळे तसेच मोती तळ्याची एकमुखी आग्रही मागणी सोमवारी झालेल्या बैठकीत केेली. गणेश मंडळांची होणारी गैरसोय, कृत्रिम तळ्यांवर होणारा खर्च तसेच विसर्जन मिरवणुकांवेळी प्रशासनावरही येणारा ताण यांचा विचार करून दोन्ही तळ्यांतच गणेशमूर्ती विसर्जन व्हावे, असा सूर गणेश मंडळांनी काढला. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक समिती गठित करून ही समिती तळ्यांच्या परवानगीसाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले  यांची भेट घेईल, असेही ठरले.

सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के  यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच शहरातील प्रतिष्ठितांची बैठक झाली. बैठकीस मुख्याधिकारी शंकर गोरे, विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, सभागृह नेत्या स्मिता घोडके, सभापती मनोज शेंडे, श्रीकांत आंबेकर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बाबर प्रमुख उपस्थित होते. सुहास राजेशिर्के म्हणाले, गणेशोत्सवात कोणतीही अडचण येणार नाही. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन योग्य निर्णय घेतले जातील. खा. उदयनराजे भोसले तसेच राजमाता  कल्पनाराजे भेासले यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. 

अशोक मोने म्हणाले, गणेश मंडळांच्या मागण्यांचा विचार करुन मंगळवार व मोती तळ्यातच गणेश विसर्जन होईल. तळ्याच्या परवानगीसाठी  राजमाता कल्पनाराजे भोसले यांची समितीबरोबर भेट घेतली जाईल, त्या नक्की परवानगी देतील.  मात्र, दोन्ही तळ्यांची वर्षाआड स्वच्छता केल्यास पाण्याची दुर्गंधी पसरणार नाही.  मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे पुनरुज्जीवन करुन या समितीमार्फत मंडळांचे प्रश्‍न सोडवले पाहिजेत, असेही मोने म्हणाले.

अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, ऐनवेळी रिसालदार तळ्यास परवानगी नाकरल्याने पदाधिकार्‍यांची धावपळ झाली. सातारा शहरात पारंपारिक पध्दतीनेच गणेश विसर्जन केले जाईल. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटी स्थापन केली जाईल. सौ. स्मिता घोडके म्हणाल्या,  दि. 27 रोजीपर्यंत समिती स्थापन करुन आठ दिवसांत तळ्यांचा निर्णय जाहीर केला जाईल. 

नगरसेवक अमोल माहिते म्हणाले, विसर्जन तळ्यांच्या ज्वलंत विषय असतानाही नगराध्यक्षांना गांभीर्य नाही. गणेशभक्तांच्या भावनांचा विषय असताना महत्वाच्या बैठकांनाही त्या येत नाहीत. जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.ग्रेड सेपरेटरचे काम सुरु असल्याने शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाला नगरपालिकेने मधल्या रस्त्यावर जागा द्यावी, अशी मागणी श्रीकांत आंबेकर यांनी केली.

अ‍ॅड. बाळासाहेब बाबर म्हणाले, वर्षभर कुणीच  ब्र न काढणारे गणेशोत्सव जवळ आला की जागे होतात. दोन्ही तळ्यांमध्ये कोर्टाने विसर्जनास कधीच बंदी घातलेली नव्हती. मात्र, कृत्रिम तळ्याची कामे घेवून काहींनी स्वत:चा जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर लावले. आशा पंडित म्हणाल्या, तळ्यांतील गाळात गाळा काढण्यासाठी काहींनी राजकारण केले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी स्वार्थ्यासाठी उद्योग केल्याने तळ्यांचा प्रश्‍न बिकट बनला. 

प्रकाश गवळी म्हणाले, मध्यवर्ती गणेश मंडळ कार्यान्वित नसल्यामुळे गणेशोत्सवात पोलिसांवर ताण येतो. नव्या कृत्रिम तळ्यांमुळे गणेश मंडळांची प्रचंड गैरसोय होवून विनाकारण खर्च करावा लागला. तळ्यांवर खर्च होणार असला तरी गणेश भक्तांच्या भावनांचाही विचार केला पाहिजे. 

विजय काटवटे म्हणाले, न्यायालयात याचिका दाखल करुन हिंदू धर्माच्या परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. चाळीस वर्षें स्वच्छता न केल्यामुळे मंगळवार तळ्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली. देवदेवतांची विटंबना करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत आहे. 

राजू गोडसे म्हणाले, गणेश मंडळांना प्रशासनाने सहकार्य करावे. खासदार-आमदारांशी चर्चा करुन तातडीने निर्णय घ्यावा.  नगरसेविका प्राची शहाणे यांनी एक खिडकी योजना सुरु करण्याची मागणी केली. मोती व मंगळवार तळ्यात विसर्जनास 40 हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा असल्याचे जितेंद्र वाडकर यांनी सांगितले. 

हेमांगी जोशी म्हणाल्या, मंगळवार तळे हे खा. उदयनराजे यांचे तर मोती तळे न.पा. मालकीचे आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कुणी काही करु नये. नगरसेविका सिध्दी पवार, धनंजय शिंदे, बाळासाहेब शिंदे, भारत गडकरी, विजयकुमार तपासे, नितीन नारकर यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान,  उपस्थितांनी बहुसंख्येने मंगळवार तळे व मोती तळ्यातच विसर्जन व्हावे, हात वर करुन पाठिंबा दिला.