होमपेज › Satara › गावात वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना उपक्रम

गावात वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना उपक्रम

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 9:04PMसातारा : प्रविण शिंगटे

जागतिक उष्णता तसेच तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि  ऋतू बदल, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, अतिवृष्टी, पूर  इत्यादी नैसर्गिक आपत्तीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना या योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम घेण्याचे आदेश बजावले आहेत.

गावपातळीवर  वृक्षारोपणाचा  कार्यक्रम राबविण्यासाठी  व वृक्ष लागवडीचे लोकचळवळीत रूपांतर होण्यासाठी  समाजातील प्रत्येक घटक, व्यक्ती,  कुटूंब यांचा यामधील सहभाग अतिशय महत्वपूर्ण आहे. या अनुषंगाने रानमळा ता. खेड या गावातील ग्रामस्थांकडून जन्म, विवाह आणि देवाज्ञा या अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो.

तसेच प्रत्येक कुटुंबातील घराच्या आजूबाजूला, मोकळ्या जागेत,  परसबागेत किंवा शेताच्या बांधावर फळझाडांची रोपे लावून आपल्या प्रिय व्यक्तींची आठवण दिर्घकाळासाठी जपली जात आहे. अशा उपक्रमातून रानमळा हे गाव हिरवेगार आणि पर्यावरण समृध्द होण्यास मोठा हातभार लागला आहे. त्याचबरोबर कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. देशातील अनेक लोक हे हिरवेगार गाव पाहण्यासाठी येत आहेत.

राज्यातील वनक्षेत्र 20 टक्केवरून 33 टक्केपर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी  उपक्रम राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याला हिरवेगार आणि सुरक्षित पर्यावरणाच्या दिशेने नेण्यासाठी रानमळा ग्रामपंचायतीच्या धर्तीवर  सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

हरित महाराष्ट्र या महत्वाकांक्षी  उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये  वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना या योजेनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शुभेच्छा वृक्ष उपक्रमात वर्षभरात गावात जन्माला येणार्‍या बालकांच्या  जन्माचे स्वागत संबंधित कुटूंबाला फळझाडांची रोपे देवून करण्यात यावे. अशी कुटुंबे त्या झाडांना आपल्या  बाळाप्रमाणे जीव लावून त्यांचे संवर्धन करतील.शुममंगल वृक्ष  उपक्रमात दरवर्षी गावातील ज्या तरूणांचे  विवाह होतात त्यांना  फळझाडांची रोपे देवून शुभाशिर्वाद द्यावेत. आनंदवृक्ष उपक्रमात दरवर्षी गावातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण होतील, गावातील ज्या तरूण तरूणींना नोकर्‍या मिळतील आणि गावातील जे उमेदवार विविध निवडणूकांमध्ये विजयी होतील, अशा आनंदाच्या क्षणी त्यांना फळझाडांची रोपे देवून  पुढील वाटचालीसाठी शुभाशिर्वाद द्यावेत.

माहेरची साडी उपक्रमात गावातील ज्या कन्यांचे विवाह वर्षभरात होतात त्या सासरी गेलेल्या असतात, त्यांना सासरी जावून झाडाचे रोप देणे अवघड असते म्हणून या विवाहित कन्यांच्या  माहेरच्या  लोकांना फळझाडांची रोपे देवून त्यांना शुभाशिर्वाद द्यावेत. आपल्या लेकीप्रमाणेच माया देवून त्या झाडांचे संबंधित कुटुंब संगोपन करतील. 

स्मृती वृक्ष उपक्रमात एखाद्या गावामध्ये ज्या व्यक्तीचे वर्षभरामध्ये निधन होते. त्या कुटुंबाला फळझाडाचे रोप देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी. हे कुटुंब झाडाच्या रुपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन करतील. या उपक्रमासाठी समाजातील पर्यावरण प्रेमी व्यक्ती, दानशूर लोक आणि सीएसआरच्या माध्यमातून देणगी रुपाने फळझाडे मिळवावीत. वन, सामाजिक वनीकरण यांच्यामार्फत वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होण्यास मदत होतील. याशिवाय खासगी रोपवाटिकांमधून देखील रोपांची उपलब्धता होवू शकणार आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी  ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे उपलब्ध होणार्‍या  उत्पन्नाच्या स्त्रोतातून खर्च करावयाचा आहे. 

 

Tags : natural disaster, Tree, Tree planting, satara, satara news,