Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Satara › वाघ महत्त्वाचा की माणूस?

वाघ महत्त्वाचा की माणूस?

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 10:44PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एक पट्टेरी वाघ दिसल्याचं छायाचित्र एका कॅमेर्‍यात टिपलं गेल्यानंतर वन्यजीव विभाग तसेच प्राणी प्रेमींनी दिवाळी साजरी केली. ही एक सकारात्मक बाजू असली तरी ही जंगल अबाधित ठेवणार्‍या लाखो स्थानिक जनतेच्या आयुष्याचे याच प्रकल्पांमुळे अक्षरशः वाटोळे झाले, त्यांचे शासन पुढे काय करणार असा संतप्त सवाल स्थानिक जनतेतून उपस्थित केला जात आहे.  

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघ नक्की आहे का? हा गेल्या अनेक वर्षांपासून संशोधनाचा विषय आहे. गेल्या काही वर्षात केवळ वाघाची विष्ठा यावरही बरेच रामायण घडले. आता आठ वर्षांत पहिल्यांदाच या प्रकल्पाच्या कॅमेर्‍यात मे महिन्यात एक वाघ टिपला गेल्याचे जून महिन्याच्या अखेरीला जाहीर करण्यात आले आहे. यामुळे प्राणी प्रेमी व वन्यजीव विभागाने आनंदोत्सव साजरा केला. वास्तविक हे कॅमेरे चालू किती व बंद किती? काही कॅमेरे चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल आहेत. मुळात याबाबत सामान्यांसह स्थानिकां मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

आजवर ज्यांनी स्वतःच्या मुलाबाळां प्रमाणे ही जंगले राखली त्यांच्यावरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्य, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प हे लादण्यात आले आहेत त्याचे काय? यातून इतरांचे पर्यावरण राखण्यासाठी स्थानिकांना देशोधडीला लावताना अनेक जाचक अटी , कायदे व निर्बंध घातलेत त्याचे काय, असा स्थानिकांचा प्रश्‍न आहे. मात्र त्याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. 

ज्यावेळी एका वाघाच्या अस्तित्वावरून एवढा आनंदोत्सव साजरा होतो त्याचवेळी याच वाघासाठी ज्या लाखो स्थानिकांनी आजवर जे सोसले त्यांच्याही जगण्याचा किमान विचार होणे गरजेचे आहे. शासन पटलावरून स्थानिकांच्या पुनर्वसन अथवा नागरी सुविधांसाठी कोट्यवधीचा निधी टाकल्याच्या बतावण्या होत असल्या तरी प्रत्यक्षात हा निधी कोठे व कोणासाठी खर्च झाला याचाही तपास होणे गरजेचे आहे. मानवाचे रक्षण व्हावे यासाठी पर्यावरण, वन्यजीव तथा वाघांचे संवर्धन झालेच पाहिजे. पण स्थानिकांचा किमान जगण्याचा हक्क व उदरनिर्वाह याचाही सार्वत्रिक विचार होणे महत्त्वाचे आहे.