Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Satara › चोरे विकास मंचच्या माध्यमातून सिमेंट बंधारा गाळमुक्‍त

चोरे विकास मंचच्या माध्यमातून सिमेंट बंधारा गाळमुक्‍त

Published On: May 05 2018 12:53AM | Last Updated: May 04 2018 8:56PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

गांव करील ते राव काय करणार याची प्रचिती नुकतीच चोरे ता.कराड येथे चोरे विकास मंच च्या कामगिरी तून आली असून, विकास मंचच्या सदस्यांनी सलग तेरा तास काम करून, सुमारे वीस वर्षभरापूर्वी चा  गाळाने भरलेला सिमेंट बंधारा गाळमुक्त केला आहे. दरम्यान सदर बंधार्‍यामुळे बारा लाख लिटर पाणी साठा होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे.

चोरे ता. कराड येथील पुणे, मुंबई, कराड, सातारासह इतर ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या नोकरदार मंडळींनी सामाजिक भावनेतून एकत्र येवून चोरे विकास मंचची स्थापना केली आणि गावातील शिक्षण, शेती, सामाजिक, क्रीडा या क्षेत्रात समाजाला प्रेरित असणारे काम करण्याचा निर्णय घेतला्. व याची सुरुवात गाळाने भरलेला सिमेंट बंधारा गाळमुक्त करण्याच्या कामाने झाली. या कामासाठी विचार मंचच्या सदस्यांनी कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता आपल्या परिने वर्गणी काढून कामास प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला व कामास प्रारंभ ही केला.

कुंभारकी नावच्या शिवारात असणारा हा सिमेंट बंधारा वीस वर्षांपूर्वी चा असून हा सिमेंट बंधारा पूर्णतः गाळाने भरलेला होता.  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सकाळी सात वाजता मंच चे सदस्य जवान शरद भोसले यांनी स्वतः चा टॅक्टर मोफत माती वाहण्यासाठी देऊन सुरुवात केली. सकाळी सात ते सायंकाळी आठ पर्यंत विकास मंचचे  संजय गोळे, दिलीप साळुंखे, प्रा महेश लोखंडे, प्रा जगन्नाथ देटके, ह.भ. प. राजकुमार माने, आबासाहेब लोखंडे, अगदं साळुंखे, सचिन भोसले, महेश सकटे, सतीश गोळे, ही मंडळी दिवसभर कामाच्या ठिकाणी उभी होती. माती नेण्यासाठी नियोजन करणे, वाहने काढण्यास मदत करणे, वहान चालकांना चहापाणी देऊन त्यांचा उत्साह वाढविणे हे काम हे मंचचे सदस्य करीत होते.   या कामास मानसिक पाठबळ देण्याचे काम दत्तात्रय यादव, सुभाष शेळके, प्रा अरविंद गोळे, रवी कवळे, मकरंद कुलकर्णी, प्रवीण साळुंखे, जवान विजय साळुंखे, निखिल साळुंखे, संतोष गोळे, माऊली साळुंखे, जवान सचिन साळुंखे,अनिल लोखडे यांनी केले. सकाळी पूर्ण भरलेला बंधारा रात्री आठ वाजता पूर्ण गाळमुक्त झाला. या बंधार्‍यातून एकशे वीस ट्रेलर गाळ निघाला असून, हा गाळ शेतीसाठी देण्यात आला आहे.

बंधार्‍याचा गाळ काढल्यामुळे बंधारा पूर्वी पेक्षा जादा खोल झाला. जवळपास पन्नास मीटर लांब, पंधरा मीटर रुंद आणि दीड मीटर खोल असा  गाळमुक्त बंधारा झाला आहे.  या बंधार्‍यात जवळपास  बारा लाख लिटर पाणी साठा होण्यास मदत होणार असल्याचे कृषी अधिकारी पुजारी, मंडल अधिकारी तटकरे यांनी सांगितले.  या बंधार्‍यासाठी  सावरघर चे सुहास पाटील ,रामदास बाबर,भांबे चे संदीप पाटील, चोरेतील प्रगतिशील शेतकरी आप्पासाहेब साळुंखे यांनी माती स्वखर्चाने नेऊन या कामासाठी मदत केली. लोकसहभागातून झालेल्या या पाणीदार बंधार्‍याच्या कामाचे कृषी अधिकारी पुजारी आणि मंडल अधिकारी तटकरे यांच्यासह विविध स्तरांतून कौतुक होत आहे. गावात नेहमी शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत असतो. या शिवारात गुरे चरण्यासाठी लोक येत असतात. महादेवाच्या डोंगरावरून पावसाचे  पाणी  मोठ्या प्रमाणात वाहून खाली ओढयाला जात होते. बंधारा पूर्ण भरल्याने पाणी सरळ खाली निघून जात होते. मात्र बंधारा गाळ मुक्त झाल्याने या बंधार्‍यात पाणी साठपा मोठ्या प्रमाणात होऊन शेतकर्‍यांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. 

Tags : Satara, Through, Chore, development, platform, cement, bund, free, sludge