Thu, Apr 25, 2019 03:37होमपेज › Satara › दहिवडीत तिघांवर खासगी सावकारीचा गुन्हा

दहिवडीत तिघांवर खासगी सावकारीचा गुन्हा

Published On: Aug 24 2018 12:48AM | Last Updated: Aug 23 2018 10:38PMदहिवडी : प्रतिनिधी

शिवसेनेचे सातारा जिल्हा उपप्रमुख संजय भोसले (रा. बिजवडी, ता. माण) यांच्यासह पाचवड (ता. माण) येथील विशाल विजय जगदाळे व हिंदुराव शंकर जगदाळे यांच्या विरोधात खासगी सावकारीचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जोतिराम तुकाराम पवार (रा. पाचवड, ता. माण) यांनी 2016 मध्ये एका पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी खासगी सावकार हिंदुराव जगदाळे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. मुद्दल व व्याज मिळून पवार यांनी जगदाळे याला 2 लाख 60 हजार परत केले; परंतु अजून एक लाख दे म्हणून जगदाळे हा पवार यांना दमदाटी करत असून, पवार यांनी दिलेला आयडीबीआय बँकेचा कोरा चेक परत देत नाही.

नोव्हेंबर 2017 मध्ये जोतिराम पवार यांनी हिंदुराव जगदाळे यांचे व्याजाने घेतलेले पैसे देण्यासाठी व शेतीकामासाठी दुसरा सावकार विशाल जगदाळे याच्याकडून 6 लाख 50 हजार रुपये  घेतले. 

प्रत्येक महिन्याला 32,500 रुपये असे एकूण पाच महिने पवार यांनी विशाल जगदाळे यास व्याज दिले. दरम्यानच्या कालावधीत विशाल हा पैशासाठी त्रास देवू लागल्याने पवार यांनी मार्च महिन्यात त्याला दोन लाख परत दिले. एक लाख ऐंशी हजार विशाल याच्या सांगण्यावरुन संजय भोसले यांच्या घरी जावून भोसले यांना दिले. त्यानंतर विशाल याने वारंवार पैशाचा तगादा लावला. 

संजय भोसले यांनी तू विशालचे पैसे का देत नाहीस म्हणून पवार यांना स्वतःच्या घरी डांबून ठेवले व रात्री दोन वाजता बिजवडी स्टॅण्डवर नेवून  मारहाण करुन पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भोसले यांनी व्याजाने घेतलेले पैसे दे नाहीतर तुझी जमीन लिहून दे, अशी दमदाटी पवार यांना केली.या त्रासाला कंटाळून जोतीराम पवार यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.