Mon, Mar 25, 2019 13:47होमपेज › Satara › अधिकार्‍यासह तीन पोलिस निलंबित

अधिकार्‍यासह तीन पोलिस निलंबित

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:57PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणूक निकालावेळी वडगाव हवेली येथील काही जणांना मारहाण केल्याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेतील स.पो.नि. हनुमंत गायकवाड, पो.कर्मचारी नितीन येळवे, देवानंद खाडे व प्रफुल्ल खाडे यांना निलंबित केले आहे. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे उपस्थित होते. 

ग्रामपंचायत निवडणूक निकालावेळी कराड येथे रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍या जमावावर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला होता. याचवेळी पोलिसांनी वडगाव हवेली येथील विजय संदे, सचिन संदे यांच्यासह अन्य एकाला मारहाण  केली होती. याप्रकरणी संबंधित युवकांवर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून संबंधित युवकांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करून वडगाव हवेली येथील संदे कुटुंबीयांसह काहीजणांनी तहसील कार्यालयासमोर गेल्या 24 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या कालावधीत विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तरीही आंदोलन मागे घेण्यात आले नव्हते. दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. अखेर या प्रकरणात कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह तीन कर्मचार्‍यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे पोलिसप्रमुख पाटील यांनी सांगितले.

संदे कुटुंबीयांचे आंदोलन स्थगित...

मारहाण करणार्‍या दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर संदे कुटुंबीयांचे 24 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू होते. शनिवार, दि. 2 रोजी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर एका अधिकार्‍यासह तीन कर्मचारी  निलंबित केल्याची माहिती त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. जिल्हा पोलिसप्रमुखांनी केलेल्या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.