होमपेज › Satara › तीन पोलिस निलंबित

तीन पोलिस निलंबित

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 11:42PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलिस दलातील एकूण तीन पोलिस हवालदारांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले असून या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यामध्ये लाचप्रकरणी पाटणचे दोन, तर आदेश न मानल्याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्याच्या एका पोलिसाचा समावेश आहे.

संजय बाळकृष्ण राक्षे, कुलदीप बबन कोळी या दोघांना नुकतेच सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन हजार रुपयांप्रकरणी कारवाई केली आहे. एकाच पोलिस ठाण्याचे दोन पोलिस जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली होती. एसीबीची कारवाई झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनाही कारवाईचा पुढील फास आवळला आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय हे पोलिस मुख्यालय राहणार असून त्यांच्या प्राथमिक चौकशीचे (पीई) आदेश देण्यात आले आहे.

दरम्यान, वाठार पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार आर.के जगताप यांनी एका प्रशिक्षणास जाण्याबाबत नकार दिला. तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्या सूचनांचे पालन त्यांनी केले नाही. यामुळे जगताप यांनाही निलंबित करण्यात आले असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय हे कोरेगाव पोलिस ठाणे देण्यात आले आहे.

या तिन्ही पोलिसांचे वर्तन बेशिस्त आहे. या पोलिसांच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झालेली आहे. यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस दलात बेशिस्त वर्तणूक करणार्‍या पोलिसांवर अशीच कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.