Wed, Apr 24, 2019 07:43होमपेज › Satara › साताऱ्यात तीन पोलिस निलंबित

साताऱ्यात तीन पोलिस निलंबित

Published On: Jul 12 2018 7:43PM | Last Updated: Jul 12 2018 7:43PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलिस दलातील एकूण तीन पोलिसांना गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहेे. यामध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यातील दोघेजण तर लोणंद येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान, सातार्‍यातील किरण सपकाळ या युवतीने केलेल्या आत्महत्येप्रकरणीही संबंधित पोलिसावर कारवाई करण्यात आली.

सहायक फौजदार महेश धुमाळ हे सध्या लोणंद पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. मात्र, 2016 पासून ते वारंवार कर्तव्य टाळण्याच्या उद्देशाने विनापरवाना पोलिस ठाण्यात गैरहजर राहिले आहेत. अनुपस्थितीबाबत त्यांना वेळोवेळी विचारणा झाली; मात्र त्याला दाद न देता बेशिस्त वर्तन केले आहे. यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले असून निलंबन कालावधीत त्यांना वाठार पोलिस ठाणे हजेरीसाठी देण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. 

दरम्यान, पोलिस हवालदार डी.एस.कणसे सध्या सातारा शहर पोलिस ठाणे हेदेखील वारंवार पोलिस ठाण्यात गैरहजर राहिले असून त्यांनाही निलंबित करून त्यांनाही वाठार पोलिस ठाणे हजेरीसाठी देण्यात आले आहे.

सहाय्यक फौजदार लियाकत बशीर शेख हे सध्या वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा येथे कार्यरत आहेत. एमआयडीसी पोलिस चौकीत असताना त्यांच्याकडे तक्रारदार दशरथ सपकाळ यांनी अभिनव म्हस्के (रा. वैजनाथ परळी जि.बीड) याच्याविरुध्द तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस लियाकत शेख यांच्याकडे अदखलपात्र गुन्ह्याचा तपास होता. तक्रारीमध्ये  तक्रारदार यांची मुलगी किरण सपकाळ हिला संशयित अभिनव म्हस्के हा शिवीगाळ, दमदाटी करत होता. यातूनच किरण सपकाळ या युवतीने अखेर त्या युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहेे.

युवतीची आत्महत्या झाल्याने सातार्‍यात खळबळ उडाली होती. युवतीच्या वडिीलांनी तक्रार दिली होती. मात्र त्या तक्रारीवर पोलिस शेख यांनी संशयित म्हस्के याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. त्यामुळेच पुढे त्या युवतीने आत्महत्या केली. पोलिसाकडून जर कारवाई झाली असती तर कदाचित मुलीचे प्राण वाचू शकले असते. मात्र शेख यांच्या बेजबाबदार वागण्याने पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झालेली आहे. यामुळे त्यांना निलंबीत करुन त्यांची प्राथमिक चौकशी कोरेगाव पोलिस ठाणे हे मुख्यालय देण्यात आले आहे.