Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पोलिस कस्टडीतून पाच महिन्यात तिघे पसार

पोलिस कस्टडीतून पाच महिन्यात तिघे पसार

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:29PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

पोलिस कस्टडीतून (ताब्यातून)संशयित आरोपी पळून जाण्याची गेल्या पाच महिन्यातील एक, दोन नव्हे तर तीन घटना घडल्याने सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. पसार झालेले हे तिन्ही आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग तथा एलसीबीने पकडले होते. दुर्दैवाने मात्र हे तिन्ही संशयित आरोपी सातारा शहर, शाहूपुरी व मुख्यालयातील पोलिस बंदोबस्तातून पळून गेले असून सर्व घटना सातार्‍यातच घडल्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे ‘एलसीबी चोरांना पकडतेय पोलिस त्यांना सोडतेय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

चंद्रकांत  उर्फ चंदर लोखंडे, कैलास गायकवाड, विश्रुत नवाते अशी गेल्या पाच महिन्यात पोलिसांच्या कस्टडीतून पळून गेलेल्यांची नावे आहेत. हे तिन्ही संशयित आरोपी सराईत व धोकादायक आहेत. अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यानेच एलसीबीच्या पथकाने प्रयत्नांची शर्थ करुन त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांनी गांभीर्याने संशयित आरोपींवर ‘वॉच’ ठेवणे गरजेचे आहे. दुर्दैवाने मात्र तसे होत नसल्यानेच चोरट्यांना पळून जाण्याची आयती संधी मिळत आहे.

चोरट्यांना अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यातील लॉकअप, चौकशी कक्ष, सिव्हील हॉस्पिटल व न्यायालय या प्रमुख ठिकाणी संशयित आरोपींची ने-आण केली जाते. या व्यतीरिक्‍त संशयित आरोपी बहुतांश प्रमाणात गजाआडच असतात. जेवढा वेळ त्यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी लॉकअपमधून बाहेर काढले जाते तेवढा वेळही पोलिस लक्ष ठेवू शकत नसल्याने त्याबाबतच आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. संशयित आरोपींना बाहेर काढल्यानंतर अनेकदा अपुरा पोलिस बंदोबस्त असतो, हे देखील वास्तव आहे. मात्र जबाबदारी आल्यानंतर त्यामध्ये हयगय करणे हे चुकीचेच आहे. आरोपी हा आरोपी असतो हे लक्षात ठेवून पोलिस वागत नसून त्यांच्या गाफील वागण्यामुळे चोरांना संधी उपलब्ध होत आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

चंदर लोखंडे लॉकअपमधून पसार..

चंदर लोखंडे (रा.ढवळ ता.फलटण) हा सातारा शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून दि. 1 ऑक्टोबर रोजी पसार झाला होता. तत्पूर्वी त्याला एलसीबीच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी अटक केली होती. संशयितांकडून धारदार शस्त्रे, दुचाकी व मोबाईल, सोन्याचे दागिने असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे व सातारा येथे जबरी चोरी, घरफोडी व चेन स्नॅचिंगही केल्याची कबुली दिली होती. पोलिस कोठडी मिळाल्याने त्याला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. दि. 1 ऑक्टोबर रोजी मात्र पोलिसांची नजर चुकवून स्वच्छता गृहातील खिडकी तोडून भिंतीवरुन उडी मारुन तो पसार झाला होता. लॉकअपमधून पसार झाल्याने पोलिस दलाची मोठी नाचक्‍की झाली होती.

कैलास गायकवाडचे बेड्यासह पलायन

कैलास गायकवाड याच्याविरुध्द हाफ मर्डरसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिस अधीक्षकांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याला सातार्‍यातून तडीपार केले होते. तडीपारीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरही तो 1 जानेवारी रोजी सातार्‍यात फिरत असताना एलसीबी पोलिसांना सापडला. पोलिसांनी ताबा घेवून त्याला शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी सुपुर्द केले. मात्र भूक लागल्याचे सांगून पोलिसांचा वडापाव खाल्ल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून चक्‍क बेड्यासह पलायन केले. नवीन वर्षात शाहूपुरी पोलिसांना असा धक्‍का दिला असतानाही अद्याप तो सापडलेला नाही. दरम्यान, तडीपारीतील गुंड बेड्यासह पळून जावून दोन महिने होत आले तरी तो सापडत नसल्याने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

विश्रुत नवातेची पोलिसांच्या ‘हातावर तुरी’..

विश्रुत नवाते (रा.शनिवार पेठ, सातारा) याला एलसीबीच्या पोलिसांनी 15 ऑक्टोबर 2017  रोजी फसवणूकप्रकरणी अटक केली होती. बँक खात्यामध्ये पाचशे रुपये नसतानाही सातार्‍यातील या ठगाने धनादेशद्वारे 2 कार, 4 दुचाकी, 5 एलईडी टीव्ही असे 14 लाख 49 हजार रुपये किंमतीचे साहित्य खरेदी करुन सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर येथील शोरुम, दुकानांची  फसवणूक केल्याचे एलसीबीने समोर आणले होते. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो प्रिझन वॉर्डमध्ये मुक्‍काम ठोकून होता. मंगळवारी दि. 20 रोजी त्याला प्रिझन वॉर्डमधून डिस्चार्ज मिळाल्याने मुख्यालयातील पोलिस कारागृहात घेवून निघाले होते. सिव्हीलच्या हॉटेल परिसरात आल्यानंतर तहान लागल्याचे कारण देत थेट पोलिसाच्या हाताला हिसडा मारुन त्याने पोलिसांच्या हातावर तुरी ठेवली.