Mon, Jul 22, 2019 02:48होमपेज › Satara › तीन जीवलग मित्र भीषण अपघातात ठार

तीन जीवलग मित्र भीषण अपघातात ठार

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:39PMसातारा/वेणेगाव : प्रतिनिधी

मुंबईहून गोकाक (बेळगाव) येथे लग्‍नासाठी निघालेली भरधाव स्विफ्ट कार व मालट्रक यांचा पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खोडद (ता. सातारा) गावच्या हद्दीत भीषण अपघात होऊन त्यामध्ये कारमधील तीन जीवलग मित्र जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली असून कारचा चक्‍काचूर झाला आहे.अभिषेक उत्तम देसाई (वय  28, रा. व्ही 104, अग्‍निशमन दल, देवनार, गोवंडी, मुंबई), विक्रम वसंत माने (वय 28, रा. गोकाक, जि. बेळगाव) व राजाराम मोहन पालकर (वय 24, रा. पिंगुळी, शेटकरवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी ठार झालेल्या मित्रांची नावे आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री उशिरा अभिषेक देसाई, विक्रम माने व राजाराम पालकर हे स्विफ्ट कारमधून (एमएच 49 5967) गोकाक (बेळगाव) येथे लग्‍नसमारंभासाठी निघाले होते. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार सातार्‍यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर महामार्गावरील खोडद गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगातील ही कार पुढे असलेल्या मालट्रकला पाठीमागून जोरात ठोकली.

हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकमध्येच घुसून कारचा अक्षरश: चक्‍काचूर झाला. कार चालत्या ट्रकच्या मागे काही अंतर फरफटत गेली. या भीषण अपघातात चालक अभिषेक देसाई, राजाराम पालकर व विक्रम माने यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेचा  आवाज ऐकल्यानंतर लगतच्या पेट्रोलपंपावरील  कर्मचारी व हॉटेलमधील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. भीषणता पाहून त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना दिली.

अपघातस्थळी काचांचा व रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताची फिर्याद सोमनाथ रामचंद्र घोरपडे(रा.निसराळे) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, तिन्ही युवकांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे व रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. सोमवारी दुपारी उशीरा तिन्ही युवकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे देण्यात आले.