Sat, Nov 17, 2018 13:04



होमपेज › Satara › तीन मेडिकल कामगारांना अटक, कोठडी

तीन मेडिकल कामगारांना अटक, कोठडी

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 10:41PM



सातारा : प्रतिनिधी

हिरापूर (ता. सातारा) येथे सापडलेल्या बेकायदा गर्भपात किटप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने उर्वरित तिन्ही संशयितांना अखेर अटक केली असून न्यायालयात त्यांना हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे रा. हिरापूर), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने यापूर्वी प्रवीण ऊर्फ बाळासाहेब देशमुख (रा. सातारा) व विलास पांडुरंग देशमुख (रा. मलकापूर ता. कराड) यांना अटक केलेली होती. जिल्हा न्यायालयात त्यांच्या जामिनासाठी अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, अ‍ॅड. अमोल चिकणे यांनी काम पाहिले व नुकताच या दोघांचा जामीनही झालेला आहे.

तालुक्यातील हिरापूर येथे गर्भपात औषधाचा साठा असल्याची माहिती अन्‍न व औषध विभागाला मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांच्या सहकार्याने दीड महिन्यापूर्वी छापा टाकण्यात आला. या छाप्यात एमटीपी किटच्या गोळ्या सापडल्यानंतर सातार्‍यात खळबळ उडाली. मात्र, कारवाई कशी करायची, कलमे कोणती लावायची हेच तालुका पोलिसांना समजले नाही व त्या गोंधळात पकडलेले चारही संशयित आरोपी पळून गेले. या घटनेचे समाजमनात तीव्र पडसाद उमटल्यानंतर  अखेर या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला.

एलसीबीकडे तपास आल्यानंतर या विभागाने कलमे वाढवून लगेचच प्रवीण उर्फ बाळासाहेब देशमुख याला व नंतर विलास देशमुख या दोघांना अटक करुन खळबळ उडवून दिली. एलसीबीचा तपास सुरु असताना उर्वरित संशयित मात्र पसार झाल्याने ते आढळून येत नव्हते. तपासादरम्यान, सापडलेली औषधेच बनावट असल्याचा अहवाल आल्याने एलसीबी विभागाने दुसर्‍या टप्प्यात पुन्हा कलमे वाढवली. 
गर्भपात औषधांचा साठा सापडल्याने व त्यातील आणखी तीन संशयित आरोपी सापडत नसल्याने एलसीबीसमोर आव्हान निर्माण झाले होते. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, पोलिस हवालदार, सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, संजय जाधव हे तपास करत असताना मंगळवारी उर्वरीत तिन्ही संशयितांची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तयार करुन छापा टाकला  व त्यांना अटक केली.