Thu, May 28, 2020 10:40होमपेज › Satara › साताऱ्यात विविध अपघातांत 3 ठार

साताऱ्यात विविध अपघातांत 3 ठार

Published On: Mar 21 2018 11:22PM | Last Updated: Mar 21 2018 11:10PMकॉलेजला जातानाच काळाचा घाला...
 

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह तालुक्यातील आरळे व सोनगाव फाटा येथे झालेल्या विविध तीन अपघातांत तिघांचा मृत्यू झाला असून आरळे येथे झालेल्या अपघातांमध्ये संतप्‍त जमावाने महिलेचा मृतदेह सातारा तालुका पोलिस ठाण्यात नेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सातारा पॉलिटेक्निकचे प्राचार्य असिफ मणेर यांच्या मृत्यूने सातारच्या शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्‍त होत आहे. 
नैना रसाळ (रा. बोरखळ), विजय भोसले (रा. केसरकर पेठ) व प्राचार्य असिफ मणेर (रा. सातारा) यांचा विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत मृत्यू झाला. 

आरळे, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री 10 वाजता ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात नैना विशाल रसाळ (वय 28, रा. बोरखळ, ता. सातारा) या ठार झाल्या. बोरखळ येथे नैना विशाल रसाळ या कुटुंबीयांसोबत राहण्यास असून  सध्या त्यांच्या  गावची यात्रा सुरु आहे. यात्रा असल्याने घरगुती कामानिमित्त मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्या पती विशाल यांच्यासमवेत दुचाकीवरुन निघाल्या होत्या. आरळे येथील कै.डी.बी. कदम हॉलसमोरील रस्त्यावर एक ट्रॅक्टर बंद अवस्थेत उभा होता. या ट्रॅक्टरजवळ असतानाच पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या धडकेत नैना रसाळ गंभीर जखमी झाल्या व त्यातच ठार झाल्या.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यात्रेत असणार्‍या ग्रामस्थांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाकडे त्यांनी  धाव घेतली. अपघात पाहिल्यानंतर जमाव संतप्‍त बनला.  ग्रामस्थांनी नैना यांचा मृतदेह घेतला व थेट सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणला. अपघातप्रकरणी तत्काळ संशयितांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. मृतदेह आणल्यानंतर पोलिस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर अपघातास कारणीभूत असणार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरणारा ट्रक, ट्रॅक्टर जप्त करत चालकांना ताब्यात घेतले. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. सातारा शहरातील गोडोली चौकालगत विजय सुधाकर भोसले (केसरकर पेठ) यांना बुधवारी सकाळी दुचाकीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने ठोकरले. ते कूपर कंपनीमध्ये कामाला असून सकाळी त्यांची आठ वाजताची शिफ्ट होती. गोडोली नाक्यापासून पुढे गेल्यानंतर अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. अपघातामुळे विजय भोसले हे रस्त्याच्या बाजूला निपचीत पडले. एका एसटी चालकाला ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. भोसले यांना तत्काळ उपचारासाठी सिव्हील व तेथून पुढील उपचारासाठी खासगी रुगणालयात नेले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सोनगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी दोन दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात सातारा पॉलिटेक्निक सातारा कॉलेजचे प्राचार्य असिफ रसूल मणेर (रा.सातारा) हे जागीच ठार झाले. या अपघातात राहूल किसन कचरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघातात प्राचार्यांचा मृत्यू झाल्याने कॉलेजवर शोककळा पसरली. दरम्यान, वडूथ ता. सातारा येथेही बुधवारी सकाळी भरधाव वेगाने आलेला ट्रक जयसिंग ज्ञानदेव साबळे (वय 50) यांच्या पायावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रक तसाच पुढे जावून पलटी झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेची तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

कॉलेजला जातानाच काळाचा घाला...
बुधवारी दुपारी प्राचार्य असिफ मणेर हे दुचाकीवरून कॉलेजकडे निघाले होते. त्यांची दुचाकी सोनगाव गावच्या हद्दीत कुरणेश्‍वर घाटात आल्यानंतर याचवेळी समोरून आलेल्या दुचाकीशी त्यांच्या दुचाकीची टक्‍कर झाली.  या अपघातात एका व्यक्‍तीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृत व्यक्‍ती प्राचार्य असल्याची माहिती समोर आली. कॉलेजमध्ये या घटनेची माहिती पसरल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घटनास्थळी व जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही ठिकाणी गर्दी झाली होती. तालुका पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 

Tag : Three Killed, Truck, Two Wheeler, Accident In Satara, Satara, Police, Hospital