Thu, May 23, 2019 21:07
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मराठा क्रांती मोर्चाचे आता ठोक आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाचे आता ठोक आंदोलन

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:57PMफलटण : प्रतिनिधी  

महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षणासाठी 58 मूक मोर्चे शांततेत काढले. मात्र हे राज्य सरकार गंभीर नसल्याने मूक मोर्चा आता ठोक मोर्चा होणार असून याच पार्श्वभूमीवर फलटण येथील अधिकार गृहासमोर गुरुवार दि. 26 जुलैपासून फलटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.       

राज्यात मराठा समाजाचे मोठे प्राबल्य असतानाही मराठा आरक्षणाची शांततेत मागणी करत आहे. विधीमंडळात सातारचे आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे यांनी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात आवाज उठवला पण दुर्दैवाने सत्तेत असणार्‍या शिवसेना- भाजपा सरकारला मराठा आमदारांनी साथ दिली नाही. त्यामुळे 142  मराठा आमदारांनी राजीनामे द्यावेत, अशी भूमिका सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने घेतली होती. पंढरपूरला महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊ न देण्याच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.

दरम्यान, सत्ताधारी व विरोधी आमदार तसेच  इतर  नेत्यांविरोधात तीव्र नाराजीचे पडसाद उमटले असून आता मूक नव्हे ठोक मोर्चा होणार असून यामुळे आरक्षण द्या नाहीतर चालते व्हा, असे  मराठा समाजाच्यावतीने सांगितले जाणार आहे.

मराठा नेत्यांना आता समाजाचा रोष पत्कारावा लागत असल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण झाला असून समाज आता राजकीय लोकांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात छ. शिवाजी महाराजांची सासुरवाडी व छ. संभाजी महाराजांच्या आजोळी फलटण येथे होणार असून याची सुरुवात ठिय्या आंदोलन करून होत असून आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले आहे.