कराड : प्रतिनिधी
भिडे गुरूजी यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. भीमा कोरेगाव येथील घटनेमागे नक्षलवादी संघटनांचा हात होता, असा आम्हाला संशय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासह नक्षलवादी संघटनांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करत शुक्रवारी कराडात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
येथील दत्त चौकातून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसिलदार राजेंंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, विष्णू पाटसकर यांच्यासह विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.
पुणे येथे झालेले एल्गार परिषद आणि 1 जानेवारीला झालेला भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमामागे नक्षलवादी संघटना कार्यरत होत्या, असा आम्हाला संशय आहे. राज्यात झालेल्या नुकसानीस प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांची संघटना जबाबदार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी. शासनाने भीमा कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी करावी. भिडे गुरूजी घटनेदिवशी सांगलीतच होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नक्की कोण दोषी आहे? याचा शोध घेत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, दत्त चौकात सागर आमले यांनी भिडे गुरूजी यांच्यावरील आरोप खोटे आहेत. भीमा कोरेगाव येथील घटनेमागे राजकीय हेतून आहे का? नक्षलवादी संघटनांचा यात हात आहे का? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.