Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Satara › रामदेव बाबांसोबत हजारो योगप्रेमींचा महायोग

रामदेव बाबांसोबत हजारो योगप्रेमींचा महायोग

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 10:27PMकराड : प्रतिनिधी

योग आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध... विविध आसनांच्या प्रात्यक्षिकांसह त्याचे मानवावर होणारे परिणाम अन् सामाजिक समतेसह देशहिताबाबतचे मार्गदर्शन यामुळे कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर योग साधना करणार्‍या हजारो लोकांची योगॠषी रामदेव बाबा यांनी मने जिकंली. डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्याकडून आयोजित या योग शिबिराला पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल दोन तास विविध आसनांची प्रात्यक्षिके लोकांकडून करवून घेत रामदेव बाबा यांनी कराडकरांमध्ये योग साधनेचा संदेश रूजविला. 

‘कराडकरांच्या समृद्ध आरोग्यासाठी योग’ हे ब्रीद घेऊन डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने आणि भारत स्वाभिमान न्यास, पतंजलि योग समिती, युवा भारत, महिला पतंजलि योग समिती, पतंजलि किसान सेवा समिती यांच्या सहकार्याने कराड येथे आयोजित तीन दिवसीय योग शिबीराला शनिवारी पहाटे प्रारंभ झाला. पहाटे चार वाजल्यापासूनच नागरिकांनी शिवाजी स्टेडियममध्ये यायला प्रारंभ केला. त्यामुळे योग शिबिराचे उद्घाटन सत्र सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण स्टेडियम गर्दीने भरून गेले. पावणे पाच वाजता रामदेव बाबा यांचे आगमन झाले. सुवासिनींनी रामदेवबाबांचे औक्षण केल्यानंतर, आयोजक डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विनायक भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, मठाधिपती ब्रम्हानंद स्वामी, नगरसेवक विजय वाटेगावकर, सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, पतंलजि योगपीठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, पतंजलि योग समितीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर डॉ. अतुल भोसले यांनी स्वामी रामदेव महाराज यांना श्री विठ्ठल रूक्मिणीची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा जिल्ह्यात स्वामीजींचे प्रथमच शिबिर होत आहे. स्वामीजींनी खर्‍या अर्थाने देशभरात स्वदेशीची चळवळ बळकट केली असल्याचे गौरवोद्गार डॉ. भोसले यांनी काढले. त्यानंतर स्वामी रामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाला प्रारंभ झाला.भक्ती संगीताच्या सुरावटींवर स्वामी रामदेव महाराज यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी त्यांच्या शरीराची लवचिकता व त्यांची चपळता अक्षरश: अवाक् करणारी होती. जीवनशैली बदलल्यामुळे होणारे आजार टाळायचे असतील, तर योग स्विकारणे गरजेचे असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले. पवित्रपूर्वक आणि मनापासून केली जाणारी प्रत्येक गोष्ट योग असून, यामध्ये प्रामुख्याने व्यायाम, आसन आणि प्राणायामाचा समावेश होतो. दमा, कॅन्सर, लठ्ठपणा यासारख्या व्याधी टाळायच्या असतील, तर नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. ‘करो योग-रहो निरोग’ हा मूलमंत्र प्रत्येकाने जपायला हवा. 

विविध प्रकारची योगासने कशी करावीत ? सूर्यनमस्कार कसा करावा ? याबाबत प्रत्यक्ष सादरीकरणातून मार्गदर्शन करतानाच आपल्या अमृत वाणीतून विविध प्रकारचे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न रामदेव बाबा यांनी केला. धर्मभेद व जातीभेद हे मानवाने निर्माण केले आहेत. पण योग कुठलेही भेद पाळत नाही, कारण तो निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे. त्यामुळे धर्माचा गर्व बाळगण्यापेक्षा भारतीय असल्याचा गर्व सर्वांनी बाळगायला हवा. आपल्या प्रत्येकाच्या वागणुकीतून राष्ट्राचे प्रतिबिंब झळकायला हवे. आजच्या युवकांनी व्यसनांना दूर होऊन योग स्विकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आजही आपण इंग्रजांनी आणलेली मॅकॉलेची शिक्षण पद्धतीच अवलंबत आहोत. विदेशी कंपन्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे भारताचे अतोनात नुकसान होत आहे. अशावेळी शिक्षण, आरोग्य, भाषा या क्षेत्रांमध्ये देशाला स्वावलंबी बनवायचे असेल, तर स्वदेशीचा पुरस्कार करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादनही रामदेव बाबा यांनी केले.दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या योग शिबिरात कराडसह सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सोमवार, 16 एप्रिलला या योग शिबिराची सांगता होणार आहे. 

Tags : Sartara,Thousands, Yogapremi, Mahamyogya, Ramdev Baba