Wed, Jun 26, 2019 17:55होमपेज › Satara › रणरणत्या उन्हात कराडात भगवे वादळ

रणरणत्या उन्हात कराडात भगवे वादळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : अमोल चव्हाण

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन व भाजपाची अभिवादन यात्रा झाल्यानंतर शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, भर दुपारी रणरणत्या उन्हात मेळावा असूनही जिल्हाभरातून हजारो शिवसैनिकांचे भगवे वादळ कराडमध्ये धडकले. त्यामुळे शहरातील संपुर्ण वातावरण भगवे झाले होते. कराडच्या जनता व्यासपीठासमोरील भव्य सभा झाल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीतील भर उन्हातील मेळावा उत्साहात पार पडल्याचा आनंद शिवसैनिकांच्या चेहर्‍यावर दिसत होता. 

जिल्हा प्रमुख हर्षल कदम, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, राजेश कुंभारदरे, युवासेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदा जाधव तसेच कराड तालुका प्रमुख शशिकांत हापसे, नितीन काशिद, उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, शहर प्रमुख शशिराज करपे यांच्या प्रयत्नाला यश आले. यावेळी सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या जोशपुर्ण भाषणांने उपस्थितांची मने जिंकली. 

नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, येथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोक्यावर रणरणतं ऊन आहे. पण सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. भर दुपारी सुध्दा ऐवढी मोठी गर्दी आहे. याचे कारण एकच आहे की उध्दव ठाकरे हेच फक्त आपल्या डोक्यावर विकासाची सावली धरणार आहेत, असा विश्‍वास लोकांना आहे. सातारा शुरांचा व विरांचा जिल्हा आहे. मातीसाठी मरणार्‍यांची सर्वात जास्त संख्या सातारा जिल्ह्यातील आहे. मातीसाठी मरणारी व मातीसाठी जगणारी माणसं म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. पण याच जिल्ह्याची कष्ट करणारी माणसं आज रणरणत्या उन्हात तळमळतायंत ही मोठी शोकांतिका आहे. 

कृषी पंपाचे कनेक्शन मिळाले नाही म्हणून 1986 साली सातारा जिल्ह्यात शेतकर्‍याची पहिली आत्महत्या झाली. गेल्या तीन वर्षात सातारा जिल्ह्यात 57 हजार कृषीपंप कनेक्शन प्रलंबित आहेत. केवळ 9 हजारांना मंजुरी मिळाली आहे. कर्जमाफीबरोबर राज्यातील शेतकर्‍यांच्या विजपंपाचे संपुर्ण बिल माफ केले तर शेतकर्‍यांना खर्‍याअर्थाने उभारी येईल, असेही बानुगडे पाटील यांनी सांगितले. 

धनगरवाडी-हणबरवाडीसह सर्व योजना पूर्ण करणार

शिवसेनाप्रमुखांनी सातारा जिल्ह्यात कृष्णा खोरेच्या माध्यमातून 15 प्रकल्प दिले. त्यापैकी दोन प्रकल्प पुर्ण झाले. बाकीचे तसेच आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 15 प्रकल्प यायला शिवसेना यावी लागली. आता ते प्रकल्प पुर्ण व्हायलाही शिवसेनाच हवी आहे, असे येथील जनतेला वाटते. धनगरवाडी-हणबरवाडी योजनेचा प्रश्‍न जलसंपदामंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. जिल्ह्यातील सर्व विषय शिवसेनेच्या माध्यमातून पुर्ण केले जातील, असा विश्‍वासही नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्‍त केला.