Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Satara › यावर्षी लग्‍न तिथीची संख्या घटली 

यावर्षी लग्‍न तिथीची संख्या घटली 

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 8:57PMऔंध : वार्ताहर

यंदाच्या लग्नसराईस गुरुवार दि.19 पासून प्रारंभ होत आहे. यंदा धोंडा महिना आल्याने ऐन महिन्यात विवाह मुहूर्त कमी असून सध्या अनेक ठिकाणी कार्यालये बुक करणे, मिळेल त्या मुहूर्तावर लग्न सोहळे उरकण्यावर भर दिला जात असून 12 मेपर्यंत फक्त 17 लग्नतिथी असल्याने बँडपथके, साऊंडसिस्टीम, हारवाले, घोडामालक, भटजी, केटरर्स, आचारीमंडळींना तेजीचे दिवस आले आहेत. 

पंचांगानुसार वैशाख शुद्ध चतुर्थीपासून म्हणजेच गुरुवार दि. 19 एप्रिलपासून विवाह मुहूर्त सुरू होत आहेत. यामध्ये वीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठावीस, तीस एप्रिल हे एप्रिल महिन्यातील मुहूर्त आहेत तर मे महिन्यात एक, दोन, चार, सहा, सात, आठ, नऊ, अकरा, बारा मेपर्यंत असे येत्या 24 दिवसांत 17 मुहूर्त आहेत. 

सध्या अनेक ठिकाणी कार्यालये व अन्य बाबींचे मोठ्या प्रमाणात बुकींग झाल्याने नवीन लग्न जुळणार्‍या वधूवर मंडळींची कार्यालये शोधताना आताच दमछाक होऊ लागली आहे. मागील महिन्यात 10 मुहूर्त होते पण परीक्षांच्या हंगामामुळे त्यावेळी कमी विवाह सोहळे झाले, असे कार्यालय मालकांनी सांगितले. यावर्षी दि. 16 मे ते 13ा जून या कालावधीत धोंडा महिना असल्याने यादरम्यान एकही विवाह मुहूर्त नाही. त्यानंतर 15  जून ते 18 जुलै या कालावधीत फक्त 11 विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे लग्न मालकांना तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 

सध्या मात्र एकाचदिवशी अनेक विवाह मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी सकाळ,दुपार व सायंकाळचे मुहूर्त काढून ते उरकण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नातेवाईक, मित्रमंडळी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची यामुळे चांगलीच तारांबळ उडणार आहे.

जुलैनंतर डिसेंबरमध्येच मुहूर्त

यंदा जुलैनंतर थेट डिसेंबरमध्ये विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे तीन महिन्यातील 27 मुहूर्तावर लग्नसमारंभ उरकले जाणार आहेत. त्यामुळे मोठी धांदल उडणार आहे.