Fri, Apr 26, 2019 09:42होमपेज › Satara › सातारा पालिका नव्हे, हे तर भ्रष्टाचाराचे कुरण

सातारा पालिका नव्हे, हे तर भ्रष्टाचाराचे कुरण

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:08PM
सातारा : प्रतिनिधी
सातारा पालिकेच्या इतिहासात कधीही घडल्या नाहीत त्या गोष्टी आज सातारकरांना बघाव्या लागत आहेत. निवडणुकीपुर्वी पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार, अशी भाषणबाजी करणार्‍या खासदारांच्या आघाडीकडून सत्ता मिळाल्यानंतर पालिकेत काय गोलमाल सुरु आहे, हे हळूहळू बाहेर पडू लागले आहे. पोटासाठी घंटागाडी चालवणार्‍या सामान्य घंटागाडीचालकावर आत्महत्या करण्याची वेळ येते यावरुनच सातारा विकास आघाडीतील खंडणीखोर नगरसेवक पैशांसाठी कोणत्या थराला गेलेत हे कळत आहे. साशा कंपनीच्या ठेक्यामुळे सुरु असलेल्या भ्रष्टाचारात खालपासून वरपर्यंत सर्वांचेच हात बरबटलेले आहेत. सातारा पालिका आता पालिका राहिली नसून भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे, असा घणाघात नगर विकास आघाडीचे नेते आ.  शिवेंद्रराजे भोसले यांनी केला असून केवळ इशारा देतो असे नेहमीचे गोलगोल वक्तव्य न करता साविआचे नेते खा. उदयनराजे यांनी संबंधीत नगरसेवकाचा राजीनामा घेण्याची धमक दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, एका सर्वसामान्य घंटागाडीचालकाला पैशांसाठी हपापलेल्या सातारा विकास आघाडीच्या एका नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ यावी, यासारखे दुसरे दुर्दैव ते काय? याला जबाबदार कोण आहे? काही दिवसांपूर्वीच सातारा विकास आघाडीतील टक्केवारीसाठी लागलेली भांडणे खासदरांनी सोडवली होती. त्यावेळी तुमची निवडणूक झाली आहे. आता माझी निवडणूक आली आहे. त्यामुळे नीट कारभार करा, अशा सुचना खासदारांनी त्यांच्या नगसेवकांना दिल्याचे वर्तमानपत्रातून वाचनात आले. म्हणजे तुम्ही फक्त राजकारणासाठी कारभार करता हेच यावरुन स्पष्ट होत आहे आणि त्याचा प्रत्यय सातारकरांना अनुभवायास मिळत आहे. गेल्या वर्ष- दीड वर्षात सातारा पालिकेचा कारभार कसा चालला आहे, हे अनेकदा सातारकरांना कळून चुकले आहे.
सातारा विकास आघाडीच्या आशीर्वादाने साशा कंपनीच्या माध्यमातून सातारा पालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचारात अगदी खालपासून वरपर्यंत सर्वांचेच हात बरबटलेले आहेत. कमिशनरुपी गुळाच्या ढेपेला सत्तारुढ आघाडीतल काही नगसेवक चिकटून बसले आहेत तर, काही नगरसेवकांना ती ढेप दिसतेय पण ढेपेपर्यंत पोहचता येत नाही म्हणून सुरु असलेला आकांडतांडव सातारकर उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. खंडणीच्या जाचापायी आज त्या गरीब घंटागाडी चालकावर आयुष्य संपावण्याची वेळ आली. दुर्दैवाने त्याचे काही बरेवाईट झाले तर त्याच्या कुटूंबीयांचे काय? ज्या छत्रपतींचे वारसदार म्हणून आपण मिरवता त्या छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचा विसर पडला की काय? असा सवाल आ. शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला आहे. छत्रपतींचे थेट वंशज म्हणून मिरवणार्‍या खासदारांनी थोडीशी धमक दाखवावी. इशारा देतो, बघून घेतो अशी नेहमीची गोलगोल भाषणबाजी न करता या गंभीर घटनेची दखल घेवून संबंधीत नगरसेवकाचा राजिनामा घेण्याचे धारिष्ट्य खासदारांनी दाखवावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. 
पोलीस प्रशासनानेही कोणत्याही प्रकारचा दबाव न जुमानता त्या गरीब घंटागाडीचालकास न्याय द्यावा. संबंधीत नगरसेवकावर गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली आहे.