Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Satara › तीस गावांना केवळ चार पोलिसांचे बळ

तीस गावांना केवळ चार पोलिसांचे बळ

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 10:30PM

बुकमार्क करा

मारूल हवेली : वार्ताहर     

मल्हारपेठ (ता.पाटण) येथील पोलिस औटपोस्टला कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने हजर कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे. कार्यक्षेत्रातील तीस गावांना केवळ चार पोलिस असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान अपुर्‍या पोलिसांना पेलावे लागत आहे. 

‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत. मात्र समाजाच्या पोलिसांकडून असणार्‍या अपेक्षा आणि प्रत्यक्ष उपलब्ध पोलिस मनुष्यबळ याचे प्रमाण व्यस्त आहे. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ विभाग सर्वच बाबतीत संवेदनशील असल्याचे समजले जाते. येथे पाटण पोलीस ठाण्यातंर्गत स्वतंत्र औटपोस्ट आहे. परंतु या औटपोस्ट मधील अपुरी कर्मचारी संख्या नित्याचीच बाब झाली आहे. सुमारे तीस गावे व वाड्यावस्त्यामध्ये विखुरलेला परिसर या औटपोस्टच्या कार्यक्षेत्रात येतो. या कार्यक्षेत्रात घडणार्‍या घटनांमुळे पोलिस औटपोस्टचे महत्व आधोरेकीत झाले आहे. तर नवारस्ता, मल्हारपेठ, मुंद्रुळ हवेली, विहे, मारूल हवेली, गारवडे, बहुले या सामाजिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील गांवाचा समावेश आहे.

येथील मंजुर पोलिस स्टेशन निर्मितीचे भिजत घोंगडे कायम असताना पोलीस कर्मचार्‍यांची तोकडी संख्या कामकाजासाठी अडचणीची ठरत आहे. लोकसंख्या वाढीबरोबर गुन्ह्यांचे 
प्रमाण वाढत असल्यामुळे  पोलीसांच्या क्षमता ताणल्या गेल्या आहेत. गुन्हांचे तपास करणे, रात्रगस्त घालणे, अचानक घडणार्‍या घटना व प्रसंग हाताळणे, बंदोबस्त, कार्यालयीन कामाकाज, वाहतुकीची समस्या, अवैध व्यवसायावर नियत्रंण ठेवणे, मोर्चे, आंदोलने, व्हीआयपी सुरक्षा-अपघात, चोरी, कामाचे अनियमित तास, साप्ताहीक सुट्टी, अशा व्यस्त कामामुळे पोलीसांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे. मात्र अपुर्‍या कर्मचारी वर्गामुळे पोलीस कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.