Thu, Apr 25, 2019 03:45होमपेज › Satara › तीस तोळे सोन्यावर डल्‍ला

तीस तोळे सोन्यावर डल्‍ला

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:14PMशिवथर : वार्ताहर

शिवथर, ता. सातारा येथे चोरट्यांनी तब्बल 30 तोळे सोन्यावर डल्‍ला मारला आहे. सुमारे 3 ते 4 तास विद्युत पुरवठा खंडित झाला असताना चोरट्यांनी डाव साधला. कुटुंबीय झोपले असताना दागिन्यांचे लॉकरच चोरून नेले आहे. घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर दागिन्यांचे मोकळे लॉकर व कागदपत्रे आढळून आली आहेत. जयवंत महादेव साबळे (रा.शिवथर) यांच्या घरामध्ये ही चोरी झालेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी रात्री साबळे कुटुंबीय जेवण झाल्यानंतर झोपी गेले होते. साबळे यांचे घर दुमजली असून वरच्या मजल्यावर दोघे व खालच्या मजल्यावर दोघे झोपी गेले होते. साबळे कुटुंबीयांची तिजोरी ज्या खोलीत होती, त्या ठिकाणी कोणीही झोपलेले नव्हते. रविवारी मध्यरात्री 2 वाजता लाईट गेली व सोमवारी पहाटे आली.

सोमवारी सकाळी साबळे कुटुंबीय उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. साबळे कुटुंबीय उठल्यानंतर घरातील खोल्यांना बाहेरून कड्या लावल्या असल्याचे निदर्शनास आले. बाहेरुन कोणी व का कड्या लावल्या? असा सवाल उपस्थित झाला. साबळे कुटुंबिय तिजोरी असणार्‍या खोलीत गेले असता त्यावेळी त्या खोलीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तिजोरीचे लॉकर पाहिले असता ते गायब असल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरडा झाला.

चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 30 तोळे सोने चोरीला गेल्याने ठसे तज्ञ, श्‍वान पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता चोरट्यांनी लॉकरमधून 9 तोळ्याची दोन मोहनमाळ, 8 तोळे वजनाचे दोन गंठण, 3 तोळ्याचा राणीहार, 2 तोळ्याचे नेकलेस, 4 तोळ्याची दोन चेन, 2 तोळ्याची अंगठी असा एकूण 30 तोळे वजनाचा लाखो रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरी झालेला आहे.

श्‍वान पथक पाचारण झाल्यानंतर त्याने माग काढण्यास सुरुवात केली. श्‍वान घरापासून पुढे पुढे असे सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्याठिकाणी चोरी झालेले लॉकर निदर्शनास आले. साबळे कुटुंबिय व पोलिसांनी लॉकरची पाहणी केली असता त्यातील सोन्याचा ऐवज गायब होता. घटनास्थळी केवळ लॉकर व काही कागदपत्रे पडलेली होती. दरम्यान, यावेळी घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांनीही भेट देवून पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत. चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

किचनच्या दरवाजातून केला प्रवेश

साबळे कुटुंबीयांनी लॉकरमध्ये सर्व दागिने ठेवले होते. घरामध्ये कुटुंबीय झोपले असल्याने चोरट्यांनी घराच्या किचनच्या दरवाजातून प्रवेश केला. यावेळी बाहेरून इतर खोल्यांना कड्या लावण्यात आल्या. जर चोरी करताना कुटुंबीय जागे झाले, तर त्यांना बाहेर जाता येऊ नये, यासाठी चोरट्यांनी खबरदारी घेतली होती. तिजोरी हाती लागल्यानंतर लॉकरला लॉक असल्याचे चोरट्यांना दिसले. मात्र, लॉक निघत नसल्याने ते लॉकरच अलगद उचलले व ते घेऊन तेथून पोबारा केला. लॉकर घरानजीक सापडले असून ते बारा किलो वजनाचे असल्याचे समोर आले आहे.