कराड : प्रतिनिधी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागावच्या (ता. कराड) हद्दीत शनिवारी (दि. 2) रात्री कारचा अपघात झाला. या अपघातात सांगली जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांसह चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त कारचे टायर, कारमधील दोन बॅग, टेप रेकॉर्डर, इतर साहित्य व महत्त्वाच्या कागदपत्रांवर चोरट्यांनी डल्ला मारला. सागंली जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष इम्रान बागवान (वय 42), गुलाब पटेल (वय 40), रियाज शिकलगार (वय 45), अल्ताफ लकी (वय 40) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
इम्रान बागवान हे आपल्या तीन सहकार्यांसह पाचगणीहून मिरजकडे स्विप्ट कार (क्र. एमएच 10 सीए 5686)मधून निघाले होते. रात्री दोन वाजता वहागावच्या हद्दीत आल्यानंतर अचानक त्यांच्या कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार महामार्गावरून सरळ सेवारस्त्यावर पलटी झाली. यामध्ये बागवान यांच्यासह कारमधील चौघेजण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच हेल्पलाईनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमखींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
त्याचवेळी हेल्पलाईनच्या कर्मचार्यांनी महामार्ग देखभाल दुरुस्तीचे कर्मचारी अमित पवार यांच्याशी संपर्क साधत अपघाताची माहिती दिली. अमित पवार घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तळबीड पोलिस ठाण्याला व महामार्ग गस्त पथकाला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात जावून अपघाताची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही पोलिस सकाळपर्यंत घटनास्थळाकडे आले नसल्याचे पवार यांनी सांगितले.
त्यानंतर पवार यांनी तळबीड पोलिस कर्मचार्यांच्या समोरच महामार्ग गस्त पथकाला फोन करण्याचा प्रयत्न केला. परतुं त्याचांही फोन लागला नाही, असेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे अपघात झाल्यानंतर सकाळपर्यंत चोरट्यांनी कारचे टायर व इतर साहित्यांची चोरी केली.