Sun, Aug 25, 2019 23:34होमपेज › Satara › मोबाईल व्हिडीओद्वारे चोरट्याचा शोध

मोबाईल व्हिडीओद्वारे चोरट्याचा शोध

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:03PMकराड : प्रतिनिधी

घराच्या दरवाजाला कडी लावून मॉर्निंग वॉकला जाणार्‍या डॉक्टर दाम्पत्याने घरात चोरी करणार्‍या चोरट्यास डॉक्टर दाम्पत्याने मोबाईलची चित्रफित तयार करून पकडले. त्याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संशयिताने 10 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत सुमारे 25 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे डॉ. किशोर बाळासाहेब चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पवन मंजुनाथ रेड्डी (रा. कृष्णा रुग्णालय-कॅम्पस, मलकापूर, ता. कराड) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. किशोर चव्हाण हे आपल्या पत्नीसह दररोज सकाळी घराच्या दरवाजाला कडी लावून मॉर्निंगवॉकला जात होते. दरम्यान, डॉक्टर दाम्पत्य फिरण्यास गेल्याचे पाहून त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी काढून संशयित चोरटा डॉक्टरांच्या घरात अडकविलेल्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पसार होत होता. याबाबत संशय आल्याने डॉक्टरांनी फिरण्यास जाताना घरात मोबाईलव्दारे चित्रफित काढली. प्रथम 20 डिसेंबर रोजी तयार केलेल्या चित्रफितमध्ये संशयित पवन रेड्डी हा चोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनस आले.

त्यानंतरही त्यांनी अनेकवेळा मॉर्निंगवॉकला गेल्यानंतर घरामध्ये मोबाईल शुटींग मोडमध्ये सुरु करून केलेल्या चित्रीकरणामध्ये पवन रेड्डी हा घरात शिरून डॉक्टर चव्हाण यांच्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पसार होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे 10 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत पवन रेड्डी यांने डॉ. चव्हाण यांच्या पॅन्टच्या खिशातून सुमारे 25 हजार रुपयांची चोरी केली आहे. त्यामुळे त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नितीन येळवे करत आहेत.