Thu, Aug 22, 2019 10:55होमपेज › Satara › १४३ टीएमसी पाण्याची आवक; यंदा गतवर्षीच्या तिप्पट वीज निर्मिती

ऑगस्टअखेर कोयनेत मुबलक पाणीसाठा

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 7:57PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

पावसाळ्याचे तीन महिने संपले असून कोयना धरणात 143 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. विनावापर 51.50 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे. धरणात सध्यस्थितीत 103.52 टीएमसी पाणीसाठा असून उर्वरित नऊ महिन्यांचा विचार करता ही समाधानाची बाब आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यावर्षी 15 जुलैनंतर मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर महिन्याच्या अखेरीस काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला. मात्र असे असले तरी तीन महिन्यात 5 हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झाली आहे.

एक जूनपूर्वी धरणात सुमारे 20 टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यानंतर तब्बल 143.50 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यातील वीज निर्मितीसाठी 7.55 टीएमसी पाणी वापर झाला आहे. याशिवाय पूर्वेकडे सिंचनासाठी 1.73 तर पूर काळात 6.94 अशा एकूण 8.67 टीएमसी पाण्यावर 39.791 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तिपटीहून अधिक वीज निर्मिती पायथा वीजगृहातून करण्यात आली आहे. तर 16.22 टीएमसी पाण्याचा वापर चार जलविद्युत प्रकल्पासाठी करत 414.081 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. वीज गृहातून वीज निर्मिती करून 8.67 टीएमसी आणि विनावापर सोडण्यात आलेले पाणी असे एकूण 60.11 टीएमसी पाणी पूर्वेकडे सोडण्यात येत आहे. 

पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित असतो. त्यापैकी या तीन महिन्यांत 7.55 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे उर्वरित नऊ महिन्यांसाठी आरक्षित कोठ्यापैकी 59.95 टीएमसी पाण्यावर वीज निर्मिती होणार आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या सरासरी 30 ते 35 टीएमसी पाण्याचा प्रश्‍नही यातून निकाली निघाला आहे. 

वीज निर्मितीसह सिंचनाचा प्रश्‍न मिटला...

वीज निर्मिती आणि सिंचनासाठी आरक्षित पाणी कोठा या दोन्ही गरजा भागूनही सध्यस्थिती पाहता धरणात  यावर्षी पुन्हा पाणी शिल्लक राहणार आहे. याशिवाय आत्ताच सप्टेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यात पाऊस झाल्यास त्याचा जास्तीत जास्त वीजनिर्मितीसाठी वापर करता येऊ शकतो. त्यामुळेच तीन महिन्यातील पावसामुळे संपूर्ण राज्याला दिलासा मिळाला आहे.