Tue, Jul 23, 2019 11:03होमपेज › Satara › मंत्रालयासह पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या

मंत्रालयासह पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 11 2018 12:18AMकराड : प्रतिनिधी 

नोव्हेंबर 2017 पासून बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाबाबत पोलिसांकडून ठोस तपास होत नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटूनही काहीही उपयोग होत नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्‍त करत आपण कोणत्याही पोलिस ठाण्यासमोर अथवा मंत्रालयात जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा साकुर्डी (ता. कराड) येथील अनिल पांडुरंग कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन विशेष पोलिस महानिरीक्षकांनाही देण्यात आले आहे.

9 नोव्हेंबर 2017 रोजी अनिल कांबळे यांचा मुलगा रोहन बेपत्ता झाला. त्यानंतर कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची आपण कोल्हापूरला 9 वेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला. यापैकी दोन वेळा प्रत्यक्ष भेट होऊन 8 जानेवारीला आपण याप्रकरणी निवेदनही सादर केले आहे. तसेच सातारा येथे जाऊन पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांचीही आपण सातवेळा भेट घेतली आहे. यापैकी 4 वेळा पोलिस अधीक्षकांची भेट झाली.

त्याचबरोबर कराडला येऊन पोलिस उपअधीक्षक यांना किती वेळा भेटलो, हेच आपणास आठवत नाही. याशिवाय पोलिस महासंचालक यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही गेली 5 महिने बेपत्ता रोहनचा कोणताच ठावठिकाणा लागलेला नाही, असे या निवेदनात नमूद केले आहे.

याशिवाय माझा मुलगा बेपत्ता झाला नसून त्याला बेपत्ता करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करत आपण आपला संशय प्रत्येक निवेदनात नमूद केला आहे. मात्र, अद्यापही माझ्या मुलाचे काय झाले? हे मला कळत नाही. रोहन हुशार होता. त्याला खूप शिकायचे होते, असे नमूद करत त्याला 12 वीमध्ये 69 टक्के मार्क मिळाले होते. तो कामानिमित्त एवढे दिवस बाहेर राहूच शकत नाही. धक्कादायक बाब म्हणजे रोहन याने आपल्या एका मित्राला काही युवक आपल्याला मारण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. मात्र याबाबतही काहीच तपास होत नाही, असा दावा करत ज्या मित्राने मला ही माहिती दिली, त्यालाच काहीजण त्रास देत असल्याचे अनिल कांबळे यांनी सांगितले.

त्यामुळेच आपण विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे - पाटील यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात आपण कोणत्याही पोलिस ठाण्यासमोर अथवा मुंबईत मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.