खटाव पंचायत समितीत सावळा गोंधळ 
 

| पुढारी"> 
Sat, Jul 20, 2019 23:36होमपेज › Satara ›

खटाव पंचायत समितीत सावळा गोंधळ 
 

खटाव पंचायत समितीत सावळा गोंधळ 
 

Published On: Apr 05 2018 12:23AM | Last Updated: Apr 05 2018 12:07AMखटाव : अजय अं. कदम 

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या खटाव पंचायत समितीत गेल्या काही दिवसांपासून सावळा गोंधळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. अधिकारी आणि पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे लवकरच पदाधिकार्‍यांमध्ये होणारा खांदेपालट या परिस्थितीला कारणीभूत असल्याची तर दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांचा सदस्यांवरील वचक कमी झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सत्तेच्या साठमारीत  तालुक्यातील सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.

खटाव पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. बारापैकी आठ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. सभापतीपदाच्या  सर्वसाधारण जागेसाठी अनेकजण इच्छुक होते, त्यामुळे पक्षाने सव्वा वर्षांचा कालावधी देत सर्वांना संधी द्यायचे धोरण निश्‍चित केले. पहिल्या सभापती पदासाठी संदीप मांडवे तर उपसभापती पदासाठी कैलास घाडगे यांची वर्णी लागली. सुरुवातीचा काही कालावधी पंचायत समितीचा कारभार सुरळीत चालला. सध्या, मात्र सावळा गोंधळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. 

अधिकारी    आणि  पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सभापतींना गटविकास अधिकार्‍यांना हजर करुन घेऊ नये, असा ठराव मांडावा लागला होता. त्या ठरावावर सदस्यांचे एकमत झाल्याचेही ऐकायला मिळाले होते, त्या बीडिओंविरोधात तालुक्यातीलच जिल्हा परिषद सभापतींनी रमाबाई घरकुल घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा आग्रह धरला होता.  मात्र, आता पुन्हा काय चमत्कार झाला हे माहित नाही, कारण बीडिओ सुरोडकर पुन्हा त्याच खुर्चीत विराजमान झाले आहेत. ज्यांनी विरोध केला होता त्यांनीच बीडिओंना हजर करुन घेतले आहे. त्यांना हजर करुन घेताना ज्या सदस्यांनी  अगोदर बीडिओंना हजर करुन घ्यायचे नाही, म्हणून मांडण्यात आलेल्या ठरावाला पाठिंबा दिला होता त्या सदस्यांना आता विचारात घेतले नसल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रकरणावरुनच सभापती, उपसभापती आणि सदस्यांमधे मतभेद असल्याची चर्चा कानावर पडत आहे. या  पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची तातडीची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. 

खटाव पंचायत समितीत सध्या सत्ताधारी असूनही राष्ट्रवादीच विरोधकांची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. लवकरच होणार्‍या पदाधिकारी खांदेपालटाचीही चर्चा आत्ताच जोर धरु लागली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काय होते हे खटाव राष्ट्रवादीला चांगलेच माहित आहे. उघड उघड बंड करुन पक्षालाच आव्हान देण्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते सदस्य आणि पदाधिकार्‍यांवरिल पकड घट्ट करतील अशी अपेक्षा आहे. तसे झाले नाही तर तालुक्याला लवकरच एक राजकीय नाट्य पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 

Tags : Satara,  coordination, between, officers, office bearers