Tue, Apr 23, 2019 19:57होमपेज › Satara › बौद्धिक प्रगतीसाठी बदलाचे भान हवे : रामराजे निंबाळकर 

बौद्धिक प्रगतीसाठी बदलाचे भान हवे : रामराजे निंबाळकर 

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 10:28PMसातारा : प्रतिनिधी

शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करत असताना बदलत्या काळाशी तुलना करता डोळ्याला झापड लावून काम करत राहिले तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची नासाडी होईल. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना त्यांच्या मेंदूत काय आहे, हे  शिक्षकांनी शोधून काढून त्याला शिकवलं तर ही मुले बौध्दीकदृष्ट्या प्रगत होणार आहेत, असे मत विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.    

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. रामराजे म्हणाले, 25 वर्षांच्या काळात ग्रामीण भागातील शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. बहुतांश ठिकाणच्या शाळाच्या इमारती व खोल्यांचे अस्तित्व संपलेले आहे. सातारा जिल्ह्यात 1133 खोल्यांची गरज आहे. खासगी शिक्षण संस्थांमध्येही तीच अडचण आहे. मात्र, गोखले इन्स्टिट्यूटमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शाळेचा बदल घडवून आणला आहे. तसा बदल आता आपल्याला गावोगावी करावा लागणार आहे. माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून शाळेचा विकास केला तर शासनावर अवलंबून राहण्याची गरज  भासणार नाही. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यानंतरच ग्रामीण भागातील शाळा परिपूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

सुरक्षित व अद्यायवत शिक्षण  देण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता शिक्षकांनी स्वत: प्रयत्नशील असायला पाहिजे. शाळांचा आर्थिक व शैक्षणिक स्तर अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला तर शाळांचे प्रश्‍न सुटतील. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी शाळांनी ठराव केले पाहिजेत.

शिक्षकी पेेशा हा समाज घडवणारा पेशा आहे. आपली मुले कोणत्या क्षेत्रात जाणार आहेत त्यासाठी मुलांच्या मेंदूत काय आहे हे शिक्षकांनी शोधून काढून त्याला शिकवलं पाहिजे, तरच ग्रामीण भागातील मुले पुढे जातील. त्यासाठी जादा वेळही द्यावा लागणार आहे. इंटरनेटसह सोशल मिडीयासारखी साधने येवू घातली आहेत. तुमच्यातील माणुसकी जागृत करून विद्यार्थ्यांना  माहितीच्या माहोलात रमवा. शिक्षक व विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्‍वासाची दरी निर्माण करा. आपण कोणत्या मांडवाखाली आहे त्या मांडवाचे सुशोभिकरण करा. बदलीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून  शिक्षक वर्ग अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. बदल्यांचा विषय शिक्षकांच्यादृष्टीने ऐरणीवर आला असल्याचे ना. रामराजे यांनी नमूद केले.

आ. शिंदे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात फार मोठी आव्हाने असली तरी ग्रामीण भागात शिक्षणाचे शिवधनुष्य पेलण्याचे काम शिक्षकच करत असतो. कुठलीही आव्हाने व स्पर्धा असली तरी सातारा जिल्हा राज्यासह देशाला दिशा देत आला आहे. आज दररोज नवनवीन शासन आदेश निघत आहेत. शिक्षण खात्याशी निगडीत कारभार शिक्षणमंत्र्यानी करायचा का? ग्रामविकास विभागाने करायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्य पुरस्कार वितरण झाले त्यावेळी 2 पुरस्कार रद्द करण्यात आले. त्या शिक्षकांची निवड कशी झाली? त्यांचे व्हेरीफिकेशन का झाले नाही? असे प्रश्‍न आ. शिंदे यांनी उपस्थित करून शिक्षकांच्या बर्‍याच अडचणी आहेत त्यांच्या स्वत: च्या तालुक्यात बदल्या करा, अशाही सूचना केल्या. 

यावेळी संजीवराजे ना.निंबाळकर, डॉ. कैलास शिंदे, पुरस्कारार्थी शिक्षक शिवाजी शिंगाडे, रामचंद्र संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश पवार यांनी प्रास्तविक केले.