Fri, May 29, 2020 12:23होमपेज › Satara › डोंगरकपारीतून पायपीट करून खांद्यावरून दवाखान्यात

डोंगरकपारीतून पायपीट करून खांद्यावरून दवाखान्यात

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:04PMढेबेवाडी ः विठ्ठल चव्हाण

स्वातंत्र्याच्या 75 व्या म्हणजे रजत महोत्सवाकडे आपली वाटचाल सुरू आहे. पण वरेकरवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) या डोंगर कपारीतल्या वाडीला आजही रस्ता, आरोग्य सुविधा  किंवा परिपूर्ण मुलभूत सेवा सुविधा नाहीत,आजही आजारी रूग्णाला जिवंतपणी चौघाच्या खांद्यावरून रस्त्यावर आणावे लागते. त्यामुळे स्वातंत्र्य असले काय आणि नसले काय सारखेच अशा  जळजळीत आणि उद्विग्न भावना वरेकरवाडी ग्रामस्थांनी व्यक्‍त ेकेल्या आहेत.

वरेकरवाडी  पाटण तालुक्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या स्व. काकासाहेब चव्हाण, देशाच्या आणि राज्याच्या  राजकिय सत्ता परिघात अर्धशतकाहून अधिक काळ  सत्तेत घालविणार्‍या माजी खासदार स्व. आनंदराव चव्हाण, स्व. प्रेमलाकाकी चव्हाण या दिग्गज नेत्यांचे गांव असलेल्या कुंभारगांव या ग्रामपंचायतीत समावेश असलेली वाडी. कुंभारगावापासून पश्‍चिमेला असलेल्या दोन हजारांहून अधिक उंच डोंगराच्या कपारीत वसलेल्या वाडीत स्वातंत्र्याची पूर्ण पहाट अजून उजाडलेलीच नाही. 

पुर्वी कुंभारगांव कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात होते, सुरूवातीला साधारण 1952 ते 1980 या कालखंडात स्व.यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाचे लोकप्रतिनिधीत्व केले तर नंतर 1980 ते मतदार ते संघाची पुनरर्चना होईपर्यंत 2009 या कालखंडात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी नेतृत्व केले.दरम्यानच्या कालखंडात कुंभारगांव ग्रामपंचायतीची पुनरर्चना होऊन नव्याने निर्माण केलेल्या चिखलेवाडी ग्रामपंचातीत या वाडीचा समावेश झाला.  

माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या कालखंडात त्यांनी सर्वप्रथम या वाडीतील पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात  घेऊन वरेकरवाडीच्या वर बाराशे फूट उंचावरच्या पठारावरील तळ्याच्या नैसर्गिक रचनेचा लाभ घेऊन 1982 च्या दरम्यान ग्रॅव्हीटी नळयोजना राबविली. महिलांच्या डोक्यावरची घागर खाली आणून पायपिट थांबविली. त्यानंतर  1985 च्या दरम्यान शाळेची खोली बांधली आणि जि.प.कडून मान्यता घेऊन छोट्या छोट्या बालकांची दीड हजार फुटाचा चढ-उतार व तीन कि.मी.ची पायपिट थांबवून पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर वाडीला विजपुरवठा उपलब्ध करून दिला. स्वांतंत्र्यानंतर पहिला उजेड 1991—92 साली पडला. त्यानंतर उंडाळकर यांनीच प्रयत्न करून शेंडेवाडी पाझर तलावाचे काम केले आणि त्या तलावावरून साडेसात लाख रूपये खर्चाची दीड हजार फूट उंचीवर वसलेल्या वरेकरवाडीसाठी सतरा हॉर्सपॉवरची ईलेक्ट्रकी मोटोर बसवून नळपाणी पुरवठा योजना राबविली. 

वरील काही योजना राबवून लोकांच्या वेदना व यातायात थांबविण्यासाठी प्रयत्न झाले तरी मुळ म्हणजे रस्ता हे दुखणे कायमच होते. त्यावर काही इलाज निघालाच नाही आणि त्यातच मतदारसंघ पुनरर्चनेमुळे लोकप्रतिनिधी बदलले. डोंगर कपारीतून दीड हजार फूट खाली उतरायचे आणि पुन्हा परत चढून जायचे ही परवड काही थांबेना व आजही थांबलेली नाही. विलास पाटील यांच्यानंतर जि.प.सदस्य संजय देसाई, चिखलेवाडीचे माजी सरपंच व पाटण पं.स.चे माजी उपसभापती रमेश मोरे यांच्या माध्यमातून पुन्हा रस्त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तेव्हा पाटणकरांनी सर्व्हे सुरू केला ती सुरूवातच अडथळ्याच्या शर्यतीने झाली, त्यावर दुसरा पर्याय काढण्यात आला पण वन विभागाचा अडसर आला. तोही पाटणकरांच्या माध्यमातून दूर झाला व महत्प्रयासाने वन विभागाची परवानगी मिळाली, पाटणकर यांनी वरेकरवाडी 64 लाख रूपये व शिबेवाडी (गुढे) 46 लाख इतका निधी दिला तेव्हा शिबेवाडीचे काम पूर्ण झाले. पण काम सुरू करायला बांधकाम विभागाने टाळाटाळ केली. अखेर उपोषणाचे हत्यार उपसले व आंदोलन सुरू केले. अनेकांच्या सहकार्यातून काम सुरू झाले खरे पेण निधी संपला. त्यामुळे रूग्णांना डोलीत घालून आजही दवाखाना गाठताहेत.