Tue, Apr 23, 2019 00:39होमपेज › Satara › शिखर शिंगणापूरच्या मंदिरात चोरी; उदयनराजेंची तक्रार

शिखर शिंगणापूरच्या मंदिरात चोरी; उदयनराजेंची तक्रार

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 05 2018 2:14AMदहिवडी : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर देवस्थानमध्ये पूजाअर्चा करणार्‍या बडवे यांनी दक्षिणापेटी फोडून चोरी केली असल्याची तक्रार दस्तुरखुद्द खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, बडवे यांच्यावर तक्रारीत संशय व्यक्‍त केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, शिखर शिंगणापूर हे माण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील मोठे देवस्थान आहे. शंभू महादेवाच्या मंदिराची सध्या काही बडवे देखभाल करत आहेत. मात्र, दि. 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते दि. 27 ऑगस्ट रोजीच्या पहाटेदरम्यान मंदिरात चोरी झाली. दक्षिणापेटी फोडून त्यातील रोकड चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली.

शिखर शिंगणापूर या देवस्थानची मालकी सध्या खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. चोरीबाबतची त्यांना माहिती मिळाल्यानंतर नुकतीच त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दाखल केला. तक्रार अर्जावरून पोलिसांनी अखेर शिखर शिंगणापूर देवस्थानमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला. संशयित चोरट्यांमध्ये मंदिरातील बडवे (संपूर्ण नाव, वय, पत्ता माहीत नसल्याचे म्हटले आहे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चोरीमध्ये नेमकी रोकड, इतर ऐवजाबाबतचा उल्‍लेख केलेला नाही. सोमवारी याबाबतच्या घडामोडी घडल्यानंतर मंगळवारी दिवसभर याबाबत शिखर शिंगणापूर, दहिवडी येथे चर्चा सुरु होती.