Tue, Jul 16, 2019 22:17होमपेज › Satara › उरूल घाटात टँकर दरीत कोसळून युवक ठार

उरूल घाटात टँकर दरीत कोसळून युवक ठार

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 11:13PMमारूल हवेली : वार्ताहर

चिपळूण - पंढरपूर राज्यमार्गावरील उरूल  (ता. पाटण, सातारा) घाटात शंभर  फुटांहून अधिक खोल दरीत टँकर कोसळल्याने कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील युवक जागीच ठार झाला. बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातावेळी टँकर चालकाने मात्र उडी टाकल्याने तो बचावला आहे.

विकास संजय कदम (वय 27, रा. लांडगेवाडी ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. राजेंद्र दत्तू सदाफुले (वय 32, रा. शामरावनगर, सांगली) असे अपघातातून बचावलेल्या चालकाचे नाव आहे. 

चालक सदाफुले हे पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या उरूल घाटातून चिपळूणहून नगरच्या दिशेने निघाले होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टँकर घाटात आल्यानंतर अचानकपणे सदाफुले यांचा टँकरवरील ताबा सुटला. त्यानंतर टँकर थेट 100  फुटाहून अधिक खोल दरीत कोसळला. यावेळी सदाफुले यांनी टँकरमधून उडी मारली. मात्र विकास कदम हा झोपला असल्याने त्याला टँकरच्या केबिनमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. 

या अपघातात विकास कदम हा जागीच ठार झाला. विकास हा टँकर मालकाचा मुलगा असून तो फिरण्यासाठी टँकरमधून आला होता. यामध्ये टँकरचेही मोठे नुकसान झाले आहे. हा टँकर कवठेमहांकाळ येथील श्री व्यंकटेश्‍वरा रोडलाईन्स कंपनीचा आहे. अपघाताची नोंद पाटण पोलिस ठाण्यात झाली आहे. 

सात तासांनी मृतदेह दरीतून बाहेर ...

पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाल्यानंतर विकास कदम याचा मृतदेह केबिनमध्येच अडकला होता. दरीतील टँकर हलवणे शक्य नसल्याने पोलिसांनी क्रेन मागवली. मात्र त्यानंतरही मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. अखेर दुपारी एकच्या सुमारास मृतदेह दरीतून बाहेर काढत तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.