Fri, Apr 26, 2019 19:30होमपेज › Satara › दरीत अडकलेल्या युवकाची सुटका

दरीत अडकलेल्या युवकाची सुटका

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:27PMसातारा : प्रतिनिधी 

अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरायला गेलेला एक युवक खोल दरीत कोसळला होता. बेशुध्द अवस्थेत तब्बल दोन  दिवस त्याला दरीतच काढावे लागले असून महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे  युवक सोमवारी पहाटे किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी जखमी संभाजी जाधव यांना दरीतून बाहेर काढले. 

याबाबतची माहिती अशी, शनिवारी सायंकाळी कोडोली येथील संभाजी जाधव हे अजिंक्यता-यावर फिरण्यासाठी गेले होते. किल्ल्याच्या पाठीमागील दरीत पाय घसरुन ते पडले.  शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी ओरडायला सुरुवात केली मात्र, त्या परिसरात कोणीही नव्हते. शिवजयंतीसाठी अजिंक्यतारा किल्ल्यावरुन शिवज्योत नेणार्‍या युवकांची वर्दळ सुरु होती.  रविवारी रात्री काही युवक गडावर असताना त्यांना बचावासाठी आवाज ऐकू येत असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

रविवारी रात्री सहाय्यक फौजदार आर.के.पवार यांच्यासह दोन पोलिस अजिंक्यतार्‍यावर शोध घेत जखमी युवकापर्यंत पोहचले. मात्र पोलिसांनाही खाली उतरता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना पाचारण केले. यावेळी स्वत:पोलिस त्या जखमीला धीर मिळावा यासाठी थांबून होते. महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे  युवक पहाटे किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांनी जखमी संभाजी यांना बाहेर काढले. ही शोध मोहीम अनिल केळगणे, संजय पार्टे, सुनिल भाटिया, सनी बावळेकर, नीलेश बावळेकर, प्रवीण जाधव, दुर्वास पाटसुते यांनी फत्ते केली. जखमी संभाजी यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.