Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Satara › वसुली, सात-बारा संगणकीकरणावरून ‘जाळ’

वसुली, सात-बारा संगणकीकरणावरून ‘जाळ’

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 10:44PMसातारा : प्रतिनिधी

पुणे विभागीय कार्यालयाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट तसेच सात-बारा संगणकीकरणात बर्‍याच तालुक्यांचे काम असमाधानकारक आहे. सतत आढावा बैठकीत सूचना करूनही गांभीर्याने घेतले जात नसल्याने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी बोलावलेल्या बैठकीत अधिकार्‍यांवर चांगलाच ‘जाळ’ निघाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारीsat तसेच तहसीलदारांसमवेत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी बैठक बोलावली होती.  मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत आहे. त्यामुळे बैठकीत वसुली आणि सात-बारा संगणकीकरण  यावरच फोकस राहिला. महसूल वाढीसाठी वसुलीचे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना पूर्वी संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुठल्या तालुक्यात    किती वसुली झाली, याचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला.

यावेळी काही तालुक्यांची वसुली कमी असल्याचे आढळले. सातबारा संगणकीकरणाच्या कामाचाही जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. त्यावेळी कोरेगाव तहसील कार्यालयासह बर्‍याच तालुक्यांचे सातबारा संगणकीकरणाचे रि-एडिटचे काम अपुरे राहिल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदारांच्या कामकाजावर जिल्हाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. मार्चअखेर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट जास्तीत जास्त साध्य करुन सातबारा संगणकीकरणाचे कामही संपवावे, अशी सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी केली. वसुली तसेच सातबारा संगणकीकरणाच्या कामावर जिल्हाधिकार्‍यांनी कोरेगाव तहसीलदारांसह बर्‍याचजणांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली.  काही तालुक्यांची वसुली 70 टक्केही झाली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. सातबारा संगणकीकरणाचे कामही रखडले असून 60 टक्क्यांपर्यंतही मजल मारता आलेली नाही.

तहसीलदारांसमोर वसुलीचे आव्हान

जिल्हा खनिकर्म विभागाकडून प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असतो. मात्र, यावर्षी वाळू उपशावर बंदी आल्याने कोट्यवधींचा महसूल बुडाला. कधी काळी महसूलवृद्धीत अव्वल असणार्‍या सातार्‍याची वसुली खूप कमी आहे. वाळू लिलाव न झाल्याने मोठा फटका बसला. पंधरा दिवसांत दिलेले उद्दिष्ट साध्य करायचे तहसीलदारांसमोर मोठे आव्हान आहे.