Wed, Jul 17, 2019 18:37होमपेज › Satara › कस्तुरींनी घेतला थंडगार पन्ह्याचा आस्वाद 

कस्तुरींनी घेतला थंडगार पन्ह्याचा आस्वाद 

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 8:09PMसातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब व पर्ल वुमन्स हॉस्पिटल, यश आय. व्ही. एफ. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरी सभासदांसाठी हेम एक्झिक्युटीव्ह येथे आयोजित चैत्रा गौरी हळदी - कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.  महिला उद्योजिका पुरस्कार वितरण व डान्स स्पर्धा, सोलो परफॉर्मस्  सोबत थंडगार पन्हे अन् टाळ्यांच्या कडकडाटाने महिलांचा उत्साह दुणावला. 

दै.‘पुढारी’ने  कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.   कस्तुरी क्लबच्या माध्यमातून  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  याच पार्श्‍वभूमीवर चैत्रा गौरी हळदी - कुंकू कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चैत्रा गौरीला विविध फळे व डाळ-पन्ह्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा रुढ आहे.  चैत्र महिन्यात सूर्याची प्रखरता जास्त असल्याने शरिराला थंडावा देण्यासाठी आंब्याचे पन्हे  दिले जाते.  

चैत्र गौरीच्या नैवेद्यामध्ये अनेक फळांचा समावेश असल्याच्या पार्श्‍वभूमीवर  कस्तुरी सभासदांची फ्रुट कार्व्हिंग (फळांची सजावट) स्पर्धा  घेण्यात आली. या स्पर्धेत  ईशा तांबे यांच्या उत्कृष्ट फ्रुट कार्व्हिंगने परीक्षकांची मने जिंकली. यामध्ये केळ्यांपासून नारळाचे झाड, कलिंगडाची फुलदाणी, गाजर व काकडीच्या सहाय्याने ट्युलीप  फुले, द्राक्षांचा पुष्पगुच्छ इ. आकर्षक कलाकृती महिलांनी  बनवल्या होत्या.यावेळी महिलांची डान्स स्पर्धा घेण्यात आली. सोलोपरफार्मरमध्ये  रेणुका शिंदे हिने तर ग्रुप डान्समध्ये झेडपी महिला ग्रुप यांनी बक्षीस जिंकले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पर्ल वुमन्स हॉस्पिटल, यश आय व्ही एफ पुणेचे डॉ. चैतन्य गणपुले, साईनाथ प्रधान, डॉ. ऋतुजा शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी  नगरसेविका प्राची शहाणे, सोनाली शिंदे  यांची  उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रायोजक पर्ल वुमन्स हॉस्पिटल, यश आय व्ही एफचे डॉ. चैतन्य गणपुले हे होते. गिफ्ट प्रायोजक पालवी व्हरायटीजच्या सुषमा जगताप, लकी ड्रॉ प्रायोजक कनक ब्युटी  पार्लरच्या कोमल अनपट होत्या. डॉ. चैतन्य गणपुले यांनी स्त्री वंध्यत्वावरील उपचारांबाबत माहिती दिली. महिलांमध्ये वयाच्या  चाळीशीनंतर उदभवणार्‍या एण्डोमेट्रीसीस, पीसीओएस, डायबीटीज या आजारावरील उपाय व ते होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून अ‍ॅड. वर्षा पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना  फ्री चेकअप कुपन्स देण्यात आली. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या कॉर्डिनेटर तेजस्विनी बोराटे यांनी आभार मानले.

Tags : Satara, womens, enthusiasm,  overcrowded, applause.