Fri, Apr 19, 2019 08:09होमपेज › Satara › लिफ्टच्या बहाण्याने महिलेस लुटले

लिफ्टच्या बहाण्याने महिलेस लुटले

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:21PM

बुकमार्क करा

म्हसवड : प्रतिनिधी

म्हसवड येथे महिलेस लोखंडे वस्तीत सोडतो अशी बतावणी करून चोरट्याने दुचाकीवर बसवून निर्जन रानात नेले. त्याठिकाणी जीवे मारण्याची धमकी देवून मंगळसुत्र व कर्णफुले असा दीड तोळ्याचा ऐवज लुटून नेला. कर्णफुले हिसका मारून तोडल्याने महिलेच्या कानाला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

लोखंडेवस्ती, ता. माण येथील तायनाबाई मरिबा लोखंडे या मुलगी सीमा दत्ता कांबळे, रा. दिवड हिच्यासह लग्नसमारंभासाठी मार्डी येथे रविवारी गेल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी मार्डीवरून त्या म्हसवडला आल्या. यानंतर सीमा दिवडला गेल्या तर तायनाबाई या लोखंडेवस्तीला जाण्यासाठी मारुती मंदिराजवळ बसल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी युवक गाडीवरून आला व त्याने लोखंडे यांना मी धुळदेवला चाललो आहे, तुम्हाला लोखंडेवस्तीला सोडतो, असे सांगून गाडीवर बसवून घेऊन गेला.

तीन किमी पुढे गेल्यावर त्याने ‘एका म्हातारीला साळमुखला सोडायचे आहे,’ अशी बतावणी करत गाडी रस्त्यावरून रानात नेली.  रस्त्यापासून दूर नेल्यानंतर गाडी थांबवून त्याने तायनाबाई लोखंडे यांना जीवे मारण्याची धमकी देवून गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याची फुले व झुबे हिसका मारून घेतली. 

याममध्ये लोखंडे यांच्या कानाला  दुखापत झाली आहे. ऐवज लुटून संशयीताने पोबारा केल्यानंतर लोखंडे यांनी पुतण्याला फोन करून घडलेली घटना सांगितली. यानंतर पुतण्याने तातडीने घटनास्थळी जाऊन चुलतीला म्हसवड येथे आणले व खाजगी दवाखान्यात उपचार केलेे. घटनेने महिला भयभीत झाली आहे. महिलांवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत म्हसवड पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.