Sun, May 26, 2019 21:23होमपेज › Satara › महिला पोलिसास पतीकडून ठाण्यातच मारहाण

महिला पोलिसास पतीकडून ठाण्यातच मारहाण

Published On: Dec 23 2017 8:50PM | Last Updated: Dec 23 2017 8:50PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

बोरगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना महिला पोलिसाला त्यांच्या पतीने पोलिस ठाण्यात जाऊन चारित्र्याचा संशय घेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित पती हा मंत्रालयात क्लार्क असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, तक्रारदार महिला पोलिस सध्या निलंबित असून, या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पती अमोल अशोकराव पाटील (रा. करवडी, ता. कराड) याच्यावर   जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, महिला पोलिस पूनम आप्पासो चव्हाण (वय 26, रा, सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूनम चव्हाण या सध्या बोरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. 5 नोव्हेंबर रोजी त्या पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत होत्या. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांचा पती अमोल पाटील त्या ठिकाणी अचानक आला. पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याने महिला पोलिस असणार्‍या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी वादावादी होवून महिला पोलिसाला मारहाण करुन दगडाने मारण्याचा प्रयत्नही त्याने केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या सर्व घटनेनंतर सुमारे दीड महिन्यानंतर शनिवारी महिला पोलिसाने सातारा शहर पोलिस ठाण्यात पतीविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरुन जीवे मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमोल पाटील याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, घटना बोरगाव पोलिस ठाण्यात घडल्याने पोलिसांनी बोरगाव पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.