Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Satara › येणपे येथे बलात्कार करून महिलेचा खून 

येणपे येथे बलात्कार करून महिलेचा खून 

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:23PMकराड/उंडाळे : प्रतिनिधी 

शेतात गेलेल्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. येणपे (ता. कराड) येथे ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना 24 तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. करण शंकर कोळी (वय 22, रा. आकोली, ता. शिराळा, जि. सांगली, मूळ रा. साकुर्डी, ता. कराड) याच्यासह एका अल्पवयीन मुलास कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख यांनी सांगितले की, सोमवारी येणपेयेथे संबंधित महिला शेतात गेली होती. सायंकाळच्या सुमारास तिचा पती शेतात आल्यानंतर त्यांनी पत्नीला घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार पत्नी घरी निघाले होती. शेतापासून काही अंतरावर आल्यानंतर तोडलेल्या झाडाचे पैसे मागण्याच्या उद्देशाने संशयित आरोपी करण कोळी व त्याचा अल्पवयीन मित्र तेथे आले. त्यांनी संबंधित महिलेला अडवून बाजूला झाडात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच तोंड दाबून व गळा आवळून तिचा खून केला. 

रात्री उशिरापर्यंत पत्नी घरी न आल्याने पतीसह नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केली. मात्र, ती सापडत नसल्याने पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांनी तालुका पोलिसात दिली. दरम्यान, मंगळवारी सकाळी संबंधित महिलेचा मृतदेह शेतातील एका झुडपात आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. 

घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने त्वरित हालचाली सुरू केल्या. संशयित आरोपी करण कोळी व त्याच्या अल्पवयीन मित्राला आकोली तालुका शिराळा येथून मंगळवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. संशयितांनी संबंधित महिलेवर अत्याचार करत असताना तिच्या अंगावरील सुमारे 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही चोरून नेल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून अधिक तपास डीवायएसपी नवनाथ ढवळे करत आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुखांची घटनास्थळी भेट

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्त  जिल्हा पोलीस प्रमुख विजय पवार यांच्यासह डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी बुधवारी साकाळी गावास भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. पोलीस त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडत असून ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले. 

येणपे गावात तणावपूर्ण शांतता...

या घटनेच्या अनुषंगाने येणपे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढण्याचा इशारा पोलिसांना दिला होता. मात्र, पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी संशयित आरोपींना तत्काळ अटक केल्याचे सांगत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केल्यामुळे गावात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढविला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली आहे.