Fri, Jun 05, 2020 10:55होमपेज › Satara › दुष्काळ निवारणासाठी एकवटले येळगांवकर

दुष्काळ निवारणासाठी एकवटले येळगांवकर

Published On: Jun 11 2019 1:28AM | Last Updated: Jun 10 2019 9:01PM
येळगांव ः आनंदा शेवाळे

दुष्काळ पडल्यावर जागे होण्यापेक्षा तत्पूर्वीच दुष्काळाशी मुकाबला करण्याची तयारी ठेवली तर अशा विचाराने प्रेरीत होवून मुबलक पाणी असणार्‍या येळगाव ता. कराड येथील ग्रामस्थांनी चक्क पाणी आडवा ˆ पाणी जिरवा मोहिमेची तयारी केली आहे. युवक वर्गांने अवघ्या गावाला बरोबरच घेवून गावात दुष्काळावर मात करण्याचं तुफान गावात आणलं आहे. 

आपल्याकडे दुष्काळच पडणार नाही यासाठी आपण आतापासूनच जलसंधारणाचे काम पाणी फाऊंडेशनच्या धर्तीवर लोकसहभागातून व लोकवर्गणीतून केले तर  ही संकल्पना नामांकित कंपनीत उच्चपदस्थ नोकरीत असलेल्या येळगावच्या राहूल बाजीराव पाटील या ध्येयवादी तरूणाने  ग्रामसभेत सरपंच मन्सूर इनामदार व उपसरपंच संतोष माने यांच्या पूर्व परवानगीने मांडली आणि बघता बघता ती समाजमान्य झाली. पाणी फाऊंडेशनमध्ये अगोदरच कार्यरत असलेल्या येथीलच अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पाणी आडवा-पाणी जिरवा मोहिमेचा श्री गणेशा करण्याचे ठरले. सरपंचानीच या श्री येळोबा जल क्रांतीसाठी दोन हजारांची देणगी दिली व सध्यातरी माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांच्या दूरदृष्टीमुळे पाण्याचा दुष्काळ अजिबात जाणवत नाही. मात्र संभाव्य दुष्काळ निवारण करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्वांना या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

ग्रामसभेतच या समाजोपयोगी उपक्रमाला थेट लोकसहभाग तसेच लोकवर्गणीचे पाठबळ मिळाल्याने अनेकांनी आपल्या देणग्या जाहीर करून जमा सुद्धा केल्या.सोशल मीडियावरही रमेश शेटे, प्रशांत शेवाळेअमित पाटील, झुंजार पाटील, संतोष माने, प्रशांत साळुंखे, अक्षय मोरे आदिंसह सर्वच होतकरू युवकांनी यामध्ये उतरण्यासाठी आवाहन करतानाच प्रत्यक्ष जेसीबीच्या साहाय्याने पावसाळा तोंडावर असल्याने चरी काढण्याच्या कामाला थेट सुरुवातच केली. त्यामुळे साहजिकच लोकसहभागातून लोकवर्गणीचा ओघही वाढला आणि अवघ्या आठवड्याभरात सुमारे चाळीस-पन्नास हजार रूपये देणगी जमा झाली.     पाणी आडवा-पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत सीसीटी व डीसीसीटी हायड्रोमिटरच्या साहाय्याने चरी तयार करून चरीच्या बांधावर कृषीविभागामार्फत मिळणार्‍या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. 

येळगांवच्या पश्‍चिमेला माजीमंत्री विलासकाकांच्या विशेष प्रयत्नांतून सुमारे चौदा कोटींचे धरण येळगांव व गोटेवाडीच्या हद्दीत बांधण्यात आले असून त्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्रात ही पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबविण्यात येणार असून त्यामुळे धरणातील पाणी साठा वाढीस मदत होणार आहे.

याच अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पाणी फाऊंडेशनचे अभ्यासक जितेंद्र शिंदे जाखणगांव ता.खटाव,सत्यजित गुरव गोपूज ता.खटाव, पैगंबर मुल्ला तसेच येळगांवचे सुपूत्र व पाणी फाऊंडेशनचे अमित पाटील यांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक सिताराम पाटील,क्रषीपर्यवेक्षक आर.एस.जगताप, कृषिसहाय्यक एस.ए.दिक्षित,माजी सरपंच सौ.सुचिता शेटे,सातारा बँकेचे संचालक रघुनाथ गुरव,सखाराम गोडसे, सुरेश पाटील, बाबासाहेब तेटमे,प्रकल्पसूचक राहुल पाटील, प्रा.आर.बी.पाटीलप्राडी.टी.शेवाळे,प्रविण पाटील, सौ.मायादेवी डांगे,अ‍ॅड. सौ.दिपीका  पंकज   पाटील, प्रशांत शेवाळे,प्रशांत साळुंखे,पंकज पाटील आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.