Wed, Mar 20, 2019 09:01होमपेज › Satara › युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:33PMपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर 

आठवडा बाजारातून  भाजीपाला घेऊन घरी चाललेल्या मुलीला रस्त्यात अडवून शिवीगाळ व दमदाटी केल्याने मुलीने घरी जाऊन विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर सातार्‍यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ युवकांना अटक केली आहे. 

याबाबत वाठार स्टेशन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील अल्पवयीन युवती व तिची मैत्रिण अशा या दोघीजणी काल, रविवारी आठवडा बाजार असल्याने सायंकाळी साडेपाच वाजता पिंपोडे-भावेनगर रस्त्यावरून बाजारात निघाल्या होत्या. त्यावेळी पिडितेने आपल्या मैत्रिणीलाला हाक मारून व हात उंचावून बाजारात येणार का, असे विचारले; मात्र तिने नाही म्हटल्याने या दोघी बाजारात गेल्या. 

साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या परत येत असताना त्याच रस्त्यावर पाण्याच्या हापशीजवळ किरण राजेंद्र जाधव व नितीन अशोक आवळे या दोघांनी तू बाजारात जाताना हात कुणाला केलास, असे विचारून दमदाटी व शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सूरज शिवाजी शिंदे, नरेंद्र सिद्धार्थ वळींजे, संकेत दयानंद वाघांबरे, मयूर राजेंद्र मोरे, खंडू वसंत साळुंखे, किरण अजित पवार यांनीही गोंधळ करून शिवीगाळ केली. 

त्यानंतर त्या दोघीही घरी गेल्या. घडलेला प्रकार आईला सांगत असताना ही मुले त्यांच्या पाठीमागे घरी गेली व त्रस्त मुलीच्या आईला तुमच्या मुलीला समजावून सांगा, असे म्हणून पुन्हा तिथेही दमदाटी व शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे त्या मुलीने घराशेजारी असलेल्या छपरात जाऊन ग्लाईसिल नावाचे तणनाशक (विषारी औषध)प्राशन केले. त्यामुळे पल्लवीला उलट्या होऊ लागल्याने तिला पिंपोडे येथील मथुरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पल्लवीस सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तिची प्रकृती स्थिर आहे. पल्लवीची आई सुनीता दादा मदने यांनी संबंधित मुलांविरुध्द तक्रार दाखल केली असून आठही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार गुजर करीत आहेत.